Pune Traffic Update : पुण्यात आज ‘या’ मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३ ऑक्टोबर | गरवारे ब्रिजवर महत्त्वाची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार (Pune Traffic Update) असल्याने आज दुपारी १ ते ४ च्या दरम्यान फर्ग्युसन कॉलेज रोडवरील (Fergusson College Road) वाहतूक तात्पुरत्या स्वरुपात बंद राहणार आहे. या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पुणे शहर वाहतूक पोलिसांनी (Pune City Traffic Police) केले आहे.

वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार, जंगली महाराज रोडने येणारी व गरवारे ब्रिजवरून गुडलक चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येईल. त्यासाठी वाहनचालकांनी सरळ पुढे खंडोजी बाबा चौक येथून इच्छित स्थळी जावे, असा सल्ला दिला आहे.

तसेच, खंडोजी बाबा चौकातून फर्ग्युसन कॉलेज रोडकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. अशा वाहनांनी डावीकडे वळून प्रभात रोडने इच्छित स्थळी जावे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

याशिवाय, जंगली महाराज रोडवरील झाशीराणी चौकातून खंडोजी बाबा चौकाकडे जाणारी वाहतूकही आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल. त्यामुळे वाहनचालकांनी गोंधळ टाळण्यासाठी पोलिसांनी दाखवून दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, पुणे शहरात सध्या रस्त्यांची दुरुस्ती, पूल व ब्रिजवरील देखभाल कामे सुरू असल्याने नागरिकांना काही ठिकाणी वाहतुकीच्या मर्यादा सहन कराव्या लागत आहेत. वाहतूक पोलिसांनी नागरिकांनी संयम बाळगावा आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *