महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १४ जानेवारी | महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा मुहूर्त जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या जिल्हा परिषदांमध्ये ५०% पेक्षा कमी आरक्षण आहे, अशा ठिकाणी निवडणुका घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांमध्ये निवडणूक होणार आहे.
कोकण, पुणे आणि मराठवाडा विभागातील १२ जिल्ह्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे:
कोकण विभाग: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पुणे विभाग: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
मराठवाडा विभाग: छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर
निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन १६ ते २१ जानेवारी, छाननी २२ जानेवारी, अंतिम मुदत २७ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत, तर मतदान ५ फेब्रुवारी सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० या वेळेत होणार आहे. मतमोजणी ७ फेब्रुवारी सकाळी १० वाजता सुरू होईल. मतदान पूर्णपणे EVM द्वारे होईल आणि १ जुलै २०२५ ची मतदार यादी वापरण्यात येईल.
एकूण २५,४८२ मतदान केंद्रे आणि सुमारे १ लाख २८ हजार कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी तैनात केले जातील. जेष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गरोदर महिलांसाठी स्वतंत्र रांग व प्राधान्य दिले जाईल. आरक्षण प्रमाणपत्र असणाऱ्यांनी सहा महिन्यांत सादर करणे अनिवार्य आहे. दुसऱ्या टप्प्यात ५०% पेक्षा जास्त आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांची निवडणूक घेण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला १५ दिवसांची मुदतवाढ दिल्यामुळे १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व कार्यक्रम पूर्ण करणे आयोगावर बंधनकारक राहणार आहे.
