महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १४ जानेवारी | जागतिक व्यापाराच्या पटावर पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार चाल टाकली आहे. इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिकेकडून २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादण्याची घोषणा करत ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “इराणला आर्थिक बळ देणाऱ्यांना अमेरिकन बाजारपेठ स्वस्तात मिळणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. या निर्णयाचा फटका भारत, चीन, यूएई, तुर्कीये यांसारख्या देशांना बसण्याची शक्यता आहे.
भारतासाठी ही घोषणा विशेष चिंताजनक मानली जाते. कारण अमेरिकेने याआधीच भारतावर विविध उत्पादनांवर ५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादले आहेत. त्यात रशियाकडून खरेदी केलेल्या तेलावरचा २५ टक्के टॅरिफ आधीच लागू आहे. आता इराणशी असलेल्या व्यापारामुळे आणखी २५ टक्के शुल्क लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजेच भारताच्या निर्यातदारांसाठी अमेरिकेचा बाजार अधिक महाग होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, या निर्णयावर चीनने तीव्र प्रतिक्रिया दिली असून, “अमेरिकेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असा थेट इशारा दिला आहे. जागतिक पातळीवर व्यापारयुद्ध आणखी चिघळण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर निर्माण झाली आहे. इराणशी व्यापार करणाऱ्या देशांची यादी पाहता भारतासह पाकिस्तान, आर्मेनिया, यूएई यांचाही समावेश आहे.
मात्र भारताच्या निर्यातदारांची शिखर संस्था फियो (FIEO) याबाबत आशावादी आहे. टॅरिफचा भारतीय व्यापारावर फारसा परिणाम होणार नाही, असा दावा फियोने केला आहे. भारताकडून इराणला प्रामुख्याने तांदूळ, चहा, साखर, औषधे आणि अन्नधान्य निर्यात होते, तर इराणकडून सुका मेवा, रसायने आणि पेट्रोलियम उत्पादने आयात केली जातात. तरीही ट्रम्पांच्या या घोषणेमुळे भारताची कोंडी वाढणार का, हा प्रश्न आता दिल्लीत गंभीरपणे चर्चेत आला आहे.
