![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १४ जानेवारी | मकरसंक्रांत म्हटलं की पुणेकरांच्या डोळ्यांसमोर तिळगूळ, पतंग आणि गोड बोलणं येतं. पण यंदा या गोड सणाच्या दिवशी सोन्यानं मात्र थेट भाव वाढवून ‘तिखट’ बोलणं सुरू केलं आहे.१४ जानेवारी २०२६—शुभ दिवस, शुभ मुहूर्त… आणि सराफा बाजारात मोठी उलथापालथ!
गेल्या काही दिवसांपासून सोनं आधीच ‘आकाशाला गवसणी’ घालत होतं. ग्राहक फक्त बघत होते, खरेदीचा विचार करत नव्हते. आणि आज मकरसंक्रांतीच्या दिवशी तर सोन्यानं जणू ठरवूनच सांगितलं—“सण असो वा नसू, मी खाली येणार नाही.”
आजच्या दरांनी अनेकांचे डोळे विस्फारले. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर थेट ₹१,४२,७१० ! २२ कॅरेट सोनंही मागे नाही—₹१,३०,८१८ प्रति १० ग्रॅम.
“आता सोनं घ्यायला शुभ मुहूर्त नाही, तर शुभ कर्ज लागेल.”
चांदीनेही सणाचा मान राखत भाव बदलला आहे. १ किलो चांदीचा दर ₹२,७४,७७०, तर १० ग्रॅम चांदी ₹२,७४८. म्हणजे चांदीही आता “गरीबांची सोने” राहिलेली नाही; तीही थोडी श्रीमंत झाली आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक—चारही शहरांत चित्र जवळपास सारखंच. २२ कॅरेट सोनं ₹१,३०,५७९ आणि २४ कॅरेट ₹१,४२,४५० प्रति १० ग्रॅम. म्हणजे शहर बदललं, पण भावाचं वजन तसंच.
यामुळे सराफा बाजारात संमिश्र वातावरण आहे. काही जण म्हणतात, “सण आहे, म्हणून थोडं तरी घ्यायचंच.” तर काही जण दुकानाबाहेर उभं राहून फक्त दरफलक वाचून पुढे निघून जातायत. दागिन्यांऐवजी आता सोनं फक्त चर्चेचा विषय झालंय.
ज्वेलर्स सांगतात—दर वाढले असले तरी सणामुळे चौकशी वाढते आहे. मात्र प्रत्यक्ष खरेदी मर्यादित. कारण मेकिंग चार्ज, जीएसटी, राज्य कर… हे सगळं मिळून दागिन्यांचा दर ऐकला, की ग्राहक आधी पाणी पितो.
पूर्वी मकरसंक्रांतीला लोक सोनं घेत, आता सोनं लोकांची परीक्षा घेतं!
एक मात्र नक्की—तिळगूळ गोड आहे, पतंग स्वस्त आहे…पण सोनं? ते यंदा फक्त श्रीमंतांसाठीच उडतंय!
