महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – जूनमध्ये मागील तीन महिन्यातील एकूण वापराचे बिल आल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. लॉकडाऊन कालावधीत आधीच आर्थिक विंवचनेत अडकलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी वाढीव वीजबिलाबाबतच्या तक्रारीची पडताळणी करून शंकानिरसन केल्याशिवाय थकित वीजबिलप्रकरणी कारवाई करण्यात येणार नाही. अन्यायकारकरित्या कोणाचीही वीजजोडणी कापली जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.
लॉकडाऊन कालावधीनंतर जून महिन्यात देण्यात आलेल्या वाढीव बिलांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आज मंत्रालयात परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे, टाटा वीज कंपनीचे (वितरण) उपाध्यक्ष सुनील जोगळेकर, अदानी वीज कंपनीचे उपाध्यक्ष के. पटेल उपस्थित होते.
#lockdown कालावधीनंतर जून महिन्यात देण्यात आलेल्या वीज बिलांसंदर्भातील शंकाचे निरसन करण्यासाठी परिवहनमंत्री @advanilparab यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आमदारांची विशेष बैठक. ऊर्जामंत्री @NitinRaut_INC यांच्या विशेष उपस्थितीत झाली सविस्तर चर्चा. pic.twitter.com/rIoOOF7ePe
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 14, 2020
सामान्य ग्राहकांचा एकूण वापराच्या वीजेच्या बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र सोडून त्या-त्या विभागात संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी आणि तेथे वीज बिलाची पडताळणी करून त्यांच्या तक्रारी सोडवण्यात याव्यात, असे निर्देश डॉ. राऊत यांनी बेस्ट, टाटा, महावितरण व अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.