बकरी ईद साधेपणाने साजरी करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. कोरोनाची साथ रोखण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करीत आहोत. गेल्या चार महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले, त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद देखील साधेपणाने, जमल्यास प्रतिकात्मकरित्या आणि नियमांचे पालन करून साजरी व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केली.

बकरी ईद संदर्भात आयोजित ऑनलाईन बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख व इतर लोकप्रतिनिधींनीही बकरी ईद साधेपणाने आणि कुठेही गर्दी न करता साजरी करावी, असे आवाहन यावेळी केले.

या बैठकीला अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार अमिन पटेल, रईस शेख, अबू असिम आझमी, झिशान सिध्दिकी उपस्थित होते.

कुर्बानीचे विधी ऑनलाइन
साथरोगाविरुद्ध लढाई लढताना गेल्या चार महिन्यात जे सण उत्सव आले त्यात सर्वांनी खूप चांगले सहकार्य केले आहे. तसेच सहकार्य बकरी ईद निमित्त करावे. साधेपणाने हा सण साजरा करावी. शक्यतो कुर्बानीचे विधी ऑनलाईन करावे असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

मंडीचा आग्रह नको
यावर्षी संकटाचा सामना करून पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात सर्व सण उत्सव साजरे करू. त्यामुळे बकरी ईद निमित्त बकरी खरेदी करण्यासाठी मंडीचा आग्रह नको. सण उत्सव साजरा करताना गर्दी होऊ न देणे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच वाहतुकीमुळे साथीचा रोग पसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे त्याचा विचार करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *