महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड – जेष्ठ कामगार नेते कॉम्रेड सुभाष सरीन (वय 78) यांचे काल (गुरुवारी) रात्री दहाच्या सुमारास चिंचवड येथे एका खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झाले. सुभाष सरीन यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. कन्या अॅड. वैशाली सरीन या त्यांच्या कन्या तर गायक नंदीन सरीन हे त्यांचे पुत्र होत.
सुभाष सरीन हे पिंपरी चिंचवड शहरातील जेष्ठ साम्यवादी नेते, पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी महासंघाचे माजी सरचिटणीस होते. 1970 च्या दशकात पिंपरी-चिंचवड शहरातील कामगारांवरील अन्यायाविरोधात लाल बावट्याची संघटना उभी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
पुणे परिसरातील कामगार चळवळीत त्यांचे मोलाचे योगदान होते. साम्यवादाचा तसेच कामगार कायद्याचा त्यांचा सखोल अभ्यास होता. वाचनाचीही त्यांना प्रचंड आवड होती. एक अभ्यासू कामगारनेता अशी त्यांची ख्याती होती. अनेक कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला. अत्यंत स्पष्टवक्ते म्हणून त्यांची ओळख होती.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने क्रांतिकुमार कडुलकर यांनी त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. आमच्यासारख्या तरुणांना मार्क्सवाद आणि भारतीय वर्गीय चळवळ यांचे मार्गदर्शन त्यांनी वेळोवेळी केले होते, खरा कार्यकर्ता गरिबांच्या वस्तीत फिरतो, असे सांगणाऱ्या कॉम्रेड सुभाष सरीन याना आम्ही अखेरचा लाल सलाम करतो, असे कडुलकर यांनी म्हटले आहे.