महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – कोल्हापूर – ता. १८ – कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दररोज उच्चांकी रुग्णसंख्येची भर पडत आहे. आज, शुक्रवारी आजपर्यंत सर्वाधिक कोरोनाग्रस्त आढळून आले असून हा आकडा 293 एवढा आहे. अवघ्या बारा तासांत 50-100 नव्हे, तर तब्बल 293 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात तिघांचे मृत्यू झाले. कोल्हापूर शहरात 40 तर इचलकरंजीत 96 रुग्णांची भर पडली. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सोमवारपासून (दि. 20) सात दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. लॉकडाऊन काळात केवळ दूध, वर्तमानपत्रे आणि औषध विक्रीलाच परवानगी असेल. अन्य सर्व दुकाने, व्यवहार बंद राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यासाठी आजचा शुक्रवार कोल्हापुरकरांसाठी धक्कादायक ठरला. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून प्रथमच 12 तासांत तब्बल 293 इतके उच्चांकी बाधित आढळून आले. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1907 इतकी झाली आहे. 23 जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनातून पूर्ण बरे झालेल्यांची संख्या 971 इतकी झाली आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत 847 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात सात दिवस कडक लॉकडाऊन
कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून (दि. 20) जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या या सात दिवसांच्या कालावधीत केवळ दूध, वर्तमानपत्र आणि औषध विक्री सुरू राहील, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी स्पष्ट केले. याबाबत मार्गदर्शक सूचना आणि काय सुरू आणि काय बंद राहणार याबाबतचे आदेश उद्या, शनिवारी जिल्हाधिकारी काढतील असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याबरोबर जिल्ह्यात मृत्यूदर दुप्पट झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन कडक करण्याची मागणी विविध स्तरातून केली जात होती. शुक्रवारी सकाळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या चर्चेत लॉकडाऊन करू नये आणि कडक लॉकडाऊन करा, असे दोन मतप्रवाह समोर आले. दोन तास चाललेल्या या चर्चेत बहुतांशी लोकांनी लॉकडाऊन कडक करण्याची सूचना केली. बैठकीनंतर पालकमंत्री पाटील यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांची चर्चा केली. यानंतर सायंकाळी सहा वाजता संपूर्ण जिल्ह्यात सोमवार (दि. 20) ते रविवार (दि. 26) पर्यंत सात दिवस लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लॉकडाऊन करण्याचा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागत आहे. मात्र, सात दिवसांनंतर लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढवायचा नसेल तर नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.
नागरिकांनी घाबरू नये; दोन दिवसांचा कालावधी आहे
सोमवारपासून सर्व दुकाने बंद होणार आहेत. मात्र नागरिकांनी घाबरू नये. उद्या शनिवार आणि रविवार असा दोन दिवसांचा कालावधी आहे. त्यामध्ये स्वतःची काळजी घेत, गर्दी न करता, सुरक्षित अंतर ठेवून, सात दिवसांसाठी आवश्यक साधनसामग्री खरेदी करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
लॉकडाऊनमध्ये दूध, वर्तमानपत्र आणि औषध विक्रीला मुभा
लॉकडाऊनच्या सात दिवसांत केवळ दूध, वर्तमानपत्र आणि औषध विक्रीला मुभा राहणार आहे. याव्यतिरिक्त सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. नागरिकांना अत्यावश्यक कारणांखेरीज घराबाहेर पडता येणार नाही. जिल्ह्यात सात दिवस कफ्यू सारखी परिस्थिती राहणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने याबाबत शनिवारी आदेश काढला जाणार आहे. यानंतरच आणखी कोणत्या सेवा सुरू राहतील हे स्पष्ट होणार आहे.
जिल्हाधिकारी आज आदेश काढणार
जिल्हाधिकारी याबाबत शनिवारी आदेश काढणार आहेत. या आदेशानंतरच जिल्ह्यातील सात दिवसाच्या लॉकडाऊनबाबतचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. सरकारी कार्यालये, खासगी कार्यालये यांसह अन्य सर्व व्यवहार या कालावधीत बंदच राहतील. मात्र, त्याची स्पष्टता शनिवारी होणार आहे.