महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ ऑगस्ट ।। इंग्लंड क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने ५ विकेट्सने जिंकला. पण त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज मार्क वूड दुखापतीमुळे उर्वरित कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे.
मार्क वूडला पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना मांडीची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला अखेरच्या दोन्ही दिवशी मैदानातही उतरता आले नाही. त्याने पहिल्या सामन्यात २ विकेट्स घेतल्या होत्या.
आता तो बाहेर झाल्याने इंग्लंडने बदली खेळाडूची घोषणा केली आहे. त्याच्याऐवजी लिसेस्टरशायर क्लबकडून खेळणाऱ्या जोश हल याला संघात संधी दिली आहे. त्याला २०२२ मध्ये लिसेस्टरशायर क्लबकडून वरिष्ठ स्तरावर खेळण्याची संधी मिळाली होती.
त्याची उंची चर्चेचा विषय ठरली होती. त्याची ६ फुट ७ इंच उंची आहे. तो ऑगस्ट २०२२ मध्ये १९ वर्षांखालील इन्विटेशनल इलेव्हनकडून १९ वर्षांखालील श्रीलंका संघाविरूद्धही तीन दिवसीय सामना खेळला होता.
6ft 7in 📈
Left-Arm Fast 🚀
Introducing, Josh Hull!
🏴 #ENGvSL 🇱🇰 #EnglandCricket pic.twitter.com/3p0CpsFhp9— England Cricket (@englandcricket) August 25, 2024
त्याने २०२३ मध्ये लिसेस्टरशायरला वनडे कप जिंकून देण्यातही मोलाचा वाटा उचलला होता.
दरम्यान, इंग्लंड आणि श्रीलंका संघातील दुसरा कसोटी सामना २९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यानंतर ६ सप्टेंबरपासून तिसरा कसोटी सामना होणार आहे.
इंग्लंडचा संघ – ऑली पोप (कर्णधार), गस ऍटकिन्सन, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, जोश हल, डॅन लॉरेन्स, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, जेमी स्मिथ, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स.