महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ सप्टेंबर ।। पोर्तुगालकडून खेळण्यासाठी अजून आपल्यामध्ये बरीच क्षमता शिल्लक आहे, त्यामुळे एवढ्यात आंतरराष्ट्रीय निवृत्तीचा कोणताही विचार नाही, असे स्पष्ट मत सुपरस्टार ३९ वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डोने व्यक्त केले आहे.
वेळ येईल तेव्हा मी स्वतःच बाहेर पडेन, माझ्यासाठी तो निर्णय कठीण नसेल, असे रोनाल्डोने नेशन्स लीग स्पर्धेस सुरुवात होताना सांगितले. लिसबन येथे पोर्तुगालचा सामना क्रोएशियाविरुद्ध होणार आहे. देशाच्या संघासाठी योगदान देण्याकरिता आपल्याकडे आता क्षमता राहिलेली नाही.
त्यावेळी संघातून बाहेर पडणारा मी पहिला खेळाडू असेन, असे सांगताना रोनाल्डो याने आपला सहकारी पेप याचे उदाहरण दिले. गेल्या महिन्यात पेपने वयाच्या ४१व्या वर्षी आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर केली. बॉलन डिऑर हा फुटबॉल विश्वातील पुरस्कार पाच वेळा जिंकणारा रोनाल्डो गेली दोन वर्षे सौदी अरेबियातील अल नासर या क्लबकडून खेळत आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या युरो अजिंक्यपद स्पर्धेत रोनाल्डो अपयशी ठरला. त्याची ही विक्रमी सहावी स्पर्धा होती. पोर्तुगाल संघाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले होते. युरो स्पर्धेतील अपयशामुळे रोनाल्डोवर टीका झाली होती.
यासंदर्भात विचारले असता एवढ्यात आपण राष्ट्रीय संघ सोडणार नसल्याचे सांगितले. प्रशिक्षक रॉब्रेटो मार्टिनेझ यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचेही तो म्हणाला. राष्ट्रीय संघातून खेळत असताना लोकांच्या अपेक्षा नेहमीच फार मोठ्या असतात; परंतु खेळाडूंच्या जीवनात चढ-उतार येत असतात, असेही उत्तर त्याने एका प्रश्नावर दिले.
अजून एकही विश्वकरंडक विजेतेपद नाही
लीग फुटबॉलमध्ये रोनाल्डोच्या नावावर सर्वाधिक गोलांचे विक्रम असले तरी त्याला अजून एकदाही पोर्तुगालला विश्वविजेतेपद मिळवून देता आलेले नाही. २०२२ मध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत पोर्तुगालचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले होते. या स्पर्धेत काही सामन्यांत
रोनाल्डोला पूर्ण ९० मिनिटेही खेळवण्यात आले नव्हते. पुढील विश्वकरंडक स्पर्धा २०२६ मध्ये होणार आहे. त्यावेळी रोनाल्डोचे वय ४१ वर्षे असेल.