महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ सप्टेंबर ।। आगीमुळे जळून खाक झालेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उभारणीसाठी आपण पुढाकार घेणार असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरातील कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केलं आहे. तसंच आपल्या खासदार निधीतून १ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचंही पवार यांनी यावेळी सांगितलं. “राज्यसभा खासदार म्हणून आम्हाला पाच कोटी रुपयांचा निधी असतो. मी आताच माझ्या सचिवाकडे आपला किती निधी शिल्लक आहे, याबाबत चौकशी केली. तेव्हा त्याने सांगितलं की आपल्याकडे १ कोटी रुपये शिल्लक आहेत. मी त्यांना सांगितलं की दोन दिवसांत इथं १ कोटी रुपयांचा चेक पाठवून द्या,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
नाट्यगृह उभा करण्यासाठीच्या निधीबाबत बोलताना शरद पवार पुढे म्हणाले की, “कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपआपल्या निधीतील २० टक्के रक्कम दिली तर हे नाट्यगृह उभं करण्यास मदत होईल. खासदार शाहू छत्रपती आणि बंटी पाटील यांनी आपल्या निधीतून रक्कम दिली आहे. आता उर्वरित लोकप्रतिनिधींच्या नावाची यादी तुम्ही तयार करा, तुमच्याकडून नाही झालं तर हे काम माझ्यावर सोपवा. मी त्या सर्व लोकप्रतिनिधींना काय सांगायचं ते सांगतो आणि या सगळ्यातून आपण ही वास्तू अतिशय चांगल्या पद्धतीने उभा करू,” असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.