महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०८ सप्टेंबर ।। मला भाजप आमदार महेश लांडगे यांना मारण्याची सुपारी मिळाली असून लवकरच मी त्यांना जीवे मारणार, असा धमकीचा फोन पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कंट्रोल रुमला आला. यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत धमकी देणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. या घटनेनं पिंपरी चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
उदय कुमार राय असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तो मोर्शी येथील रहिवासी असल्याचं माहिती आहे. सध्या पोलिसांकडून (Police) आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश लांडगे हे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) पोलिसांच्या कंट्रोल रुमला आज सकाळी एका तरुणाने फोन केला. मला भाजप आमदार यांना मारण्याची सुपारी मिळाली आहे, असं त्याने पोलिसांना सांगितलं.
इतकंच नाही तर लवकरच मी त्यांना जीवे मारणार आहे, अशी धमकी देखील आरोपीने दिली. पोलिसांनी या धमकीची गंभीर दखल घेतली. आरोपीचा फोन लोकेशन चेक केल्यानंतर तो मोर्शी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने सापळा रचून या आरोपीला अटक केली.
दरम्यान, आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही 2023 मध्ये त्यांना असा धमकीचा फोन आला होता. त्यावेळी आरोपीने महेश लांडगे यांच्याकडे 30 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. आमदार लांडगे यांनी आपल्या मतदारसंघात सर्वसामान्यांच्या मदतीसाठी परिवर्तन हेल्पलाईन सुरु केलेली आहे. या हेल्पलाइनवर हा धमकीचा फोन आला होता.