महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०८ सप्टेंबर ।। 2019 साली ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत पहिली Vande Bharat Express Train सुरू करण्यात आली आणि भारताने एक नवा इतिहास घडविला. तेव्हापासून भारतात या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा विस्तार वेगाने होत आहे. देशभरातील अनेक मार्गांवर ही सुपरफास्ट ट्रेन सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) येत्या 15 सप्टेंबर रोजी झारखंडमधील जमशेदपूर येथून देशातील विविध राज्यांसाठी आणखी 10 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामध्ये पुणे-नागपूर वंदे भारत ट्रेनचाही समावेश आहे.
या मार्गांवर नवीन वंदे भारत ट्रेन धावणार
टाटानगर – पाटणा वंदे
वाराणसी – देवघर वंदे
टाटानगर-ब्रह्मपूर वंदे
रांची-गोड्डा
आग्रा-बनारस
हावडा-गया
हावडा-भागलपूर
दुर्ग-विशाखापट्टनम
हुबळी-सिकंदराबाद
पुणे-नागपूर
लवकरच स्लीपर वंदे भारत सुरू होणार
देशातील पहिली सेमी हायस्पीड वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार झाली असून तीन महिन्यांमध्ये ती प्रवाशांच्या सेवेत सादर होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्लीपर ‘वंदे भारत’च्या पहिल्या मॉडेलची झलक दाखविली. बंगळुरूच्या बीईएमएल कारखान्यात वंदे भारत स्लीपर ट्रेनचे पहिले प्रोटोटाइप मॉडल बनून पूर्ण झाले आहे. या ट्रेनचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. इतकेच नव्हे तर प्रवासी, रेल्वेप्रेमी यांच्याकडून नव्या कोऱ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात आहे. 800-1200 किलोमीटर अंतरावरील प्रवासासाठी ‘स्लीपर वंदे भारत’ तयार केली आहे. मध्यमवर्गीयांना विचारात घेऊन गाडी बनविली असून राजधानी एक्स्प्रेसएवढे भाडे राहील.
काय आहे या नव्या गाडीत खास…
नव्या गाडीत संतुलन आणि स्थिरतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यामुळे ट्रेनच्या आत आवाज कमी येईल. नवीन कपलर तंत्रज्ञानामुळे ट्रेनचे वजन कमी आणि मजबुती वाढते. ट्रेनचे डबे आणि शॉचालय अपग्रेड करण्यात आले आहे. याशिवाय ट्रेनमध्ये अनेक नवे सुरक्षा फिचर्स देण्यात आले आहेत. देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन बनविली आहे.
या आहेत सुविधा
सीटवर यूएसबी चार्जिंग, रिडिंग लाईटची सोय आहे. याशिवाय, मॉड्युलर पॅन्ट्री, डिस्प्ले पॅनल आणि सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. एसी प्रथम श्रेणीच्या डब्यात गरम पाण्याचा शॉवर मिळेल. तसेच, वरच्या बर्थवर जाण्यासाठी पायऱ्यांची नवी रचना. सामान ठेवण्यासाठी जास्त जागा अन् दिव्यांग प्रवाशांसाठी वेगळा विशेष बर्थ असेल.