महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ सप्टेंबर ।। नागपूर हिट अँड रन प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. नागपूर हिट अँड रन प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. याच प्रकरणातील अपघाताआधी संकेत आणि त्यांच्या मित्राने हॉटेलमध्ये दारू आणि बीफ कटलेट खाल्ल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. नागपूर हिट अँड रन प्रकरणात संजय राऊत यांच्या गंभीर आरोपानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. बीफवरून सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर हॉटेल मालकाने पोलिसांत धाव घेतली.
नागपूरमधील लाहोरी हॉटेलमध्ये बीफ विकलं जात असल्याचा आरोप केल्यामुळे हॉटेलची बदनामी झाल्याचा दावा मालकाने केला आहे. हॉटेलचे संचालक समीर शर्मा यांनी नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांत तक्रार दिली आहे. आमच्या हॉटेलमध्ये असा कुठलाही पदार्थ मिळत नसताना हा विषय आला कुठून असा सवाल समीर शर्मा यांनी केला आहे. आरोप करणाऱ्यांचा पोलिसांनी तपास करावा, असे हॉटेल मालकाने म्हटलं आहे.
लाहोरी हॉटेलचे मालक समीर शर्मा म्हणाले की, ‘ आमच्या हॉटेलमध्ये त्या दिवशी चार व्यक्ती आले. थोडा वेळ थांबले. त्यांनी दारू प्यायली आणि निघून गेले. मात्र, आम्ही बीफ विकतो अशा पद्धतीचा आरोप आमच्या हॉटेलवर करण्यात आला आहे. आजपर्यंत कुठली तक्रार आमच्या विरोधात झाली नाही. आमच्या मेनूकार्डमध्ये असा कुठलाही पदार्थ नाही. त्यामुळे हा बीफचा विषय कुठून आला. ज्याने कोणी आमच्या हॉटेलमध्ये बीफ पदार्थ मिळतो असा आरोप केला, कोणी केला हे माहीत नाही. याची चौकशी पोलीस करेल’.
‘त्या चारही मुलांनी आमच्याकडे कोणत्याही खाण्याच्या पदार्थाची ऑर्डर केली नव्हती. त्यांनी कोल्ड ड्रिंक आणि दारूची ऑर्डर दिली. हा बीफ पदार्थाचा आरोप कुठून आला, याचा तपास पोलिसांनी करावा. आमचं हॉटेल मागील 45 वर्षांपासून खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. अधिवेशनात आमच्याकडून मंत्र्यांसाठी जेवण जाते. यामुळे 1001 कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार आहे. या विरोधात कोर्टात जाणार आहे, असेही हॉटेलचे संचालक समीर शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.