Arvind Kejriwal Bail : सहा अटी शर्ती घालत अरविंद केजरीवालांना जामीन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ सप्टेंबर ।। दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णायामुळे अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांच्यावर मद्य धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला होता. यावरुन सीबीआयने त्यांना अटक केली होती. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी या अटकेला आव्हान देणारी आणि जामीन मिळण्यासंदर्भातील अशा दोन स्वतंत्र सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या.या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ५ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकेवरील निकाल राखीव ठेवला होता. अखेर याप्रकरणी आज सुनावणी झाली. यावेळी अरविंद केजरीवालांना जामीन मंजूर करण्यात आला.

अरविंद केजरीवाल यांना १० लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार, अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही. सरकारी फाईलवर सही करता येणार नाही. अनेक फाईलींपासून लांब राहावं लागणार आहे. तसेच, आवश्यतेनुसार ट्रायल कोर्टात हजर व्हावं लागेल आणि तपासात सहकार्य करावं लागेल. याशिवाय, मद्य धोरण घोटाळ्यासंबंधी चर्चा सार्वजनिक स्तरावर करता येणार नाही. या तपासात अडथळा आणि साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करायचा नाही, अशा काही अटी सर्वोच्च न्यायालयाने घातल्या आहेत.

अरविंद केजरीवाल हे जवळपास १७७ दिवसानंतर तुरूंगातून बाहेर येणार
अरविंद केजरीवाल हे जवळपास १७७ दिवसानंतर तुरूंगाच्या बाहेर येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांना काही दिवसांसाठी जामीन देण्यात आला होता. प्रचार झाल्यानंतर त्यांना पुन्हा तरूंगात जावे लागले होते. आता त्यांना रितसर जामीन मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *