निवडणुकीच्या आखाड्यात ; अमित ठाकरेंची विधानसभा लढवण्याची तयारी, मतदारसंघही ठरला?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ सप्टेंबर ।। आगामी विधानसभा निवडणुकीत आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मनविसे अध्यक्ष आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीची आपली तयारी असल्याची इच्छा सोमवारी पक्षाच्या आढावा बैठकीत व्यक्त केली आहे. तर त्याचवेळी आगामी निवडणुकीसाठी मुंबईतील ३६ जागांचा आढावा या बैठकीत घेण्यात आली असल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

अमित ठाकरेंचीच इच्छा
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची आढावा बैठक सोमवारी राजगडावर आयेजित करण्यात आली होती. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह नेते बाळा नांदगावकर, शिरीष सावंत, संदीप देशपांडे, अमित ठाकरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज ठाकरे यांनी मुंबईतील ३६ जागांचा आढावा घेताना या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची माहिती घेतली आहे. लवकरच मुंबईतील ३६ जागांबाबत एक सविस्तर अहवाल सादर केला जाणार असल्याचे कळते.

यावेळी खुद्द अमित ठाकरे यांनीच आपण विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं बोलून दाखवलं होतं. मुंबईतील तीन जागांची अमित ठाकरेंसाठी चाचपणी केली जात आहे. यामध्ये माहीम, भांडुप आणि मागाठणे या मतदारसंघांचा समावेश आहे.

मनसेचे कोणते नेते कुठून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता?
वरळी – संदीप देशपांडे
ठाणे – अविनाश जाधव
वडाळा – स्नेहल जाधव
जोगेश्वरी – गजानन राणे

तिरंगी लढत होणार
महाविकास आघाडी, महायुती यातील घटकपक्षांनीही मुंबईतील अधिकाधिक जागा खेचण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. मविआतून ठाकरे गट आणि काँग्रेस यांचा मुंबईवर वरचष्मा राहू शकतो. तर महायुतीत भाजप आणि शिवसेना मुंबईत जास्तीत जास्त जागा लढतील. मनसेच्या स्वबळाच्या घोषणेमुळे अनेक ठिकाणी तिरंगी लढती होणं निश्चित मानलं जात आहे. आता अमित ठाकरे जिथून निवडणूक लढतील, तिथल्या सामन्यात रंगत अधिकच वाढणार आहे.
अमित ठाकरे दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला

उद्धव काय भूमिका घेणार?
विशेष म्हणजे, अमित ठाकरेंविरुद्ध मतदारसंघात उद्धव ठाकरे उमेदवार देणार का, किंवा महाविकास आघाडीला उमेदवार उतरवू देणार का, हे पाहणंही महत्त्वाचं आहे. कारण याआधी आदित्य ठाकरेंच्या पदार्पणाला राज ठाकरे यांनी विरोधात उमेदवार देणं टाळलं होतं. तसंच महायुतीकडूनही अमित ठाकरे उतरतील त्या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत किंवा उमेदवार न देण्याची घोषणा होणार का, राज ठाकरेंशी जवळीक असल्याने शिंदे-फडणवीस त्यांच्या लेकाला निवडून आणण्यासाठी सहाय्य करणार का, हे पाहणंही महत्त्वाचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *