Weather Forecast : आज पाऊस हजेरी लावणार; तब्बल १३ राज्यांना झोडपून काढणार, वाचा वेदर रिपोर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ सप्टेंबर ।। गणरायाचे आगमन होताच देशासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. सलग दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने नद्या-नाले तुडूंब झाले. त्यामुळे अनेक जिल्ह्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला. मात्र, मागील आठवडाभरापासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. अशातच बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी पुन्हा एकदा पाऊस धुमाकूळ घालणार, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. आज तब्बल १३ राज्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पश्चिम बंगालवर खोल दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे देशातील तब्बल १३ राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि बिहारमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे.

तर ओडिशा, पश्चिम बंगाल, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा आणि केंद्रामध्ये पुढील दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय अंदमान आणि निकोबार बेटावर देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून मुंबई, पुणे आणि कोकणात हलक्या पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी अधून मधून पावसाची शक्यता आहे. येत्या १९ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्राला पावसाचा कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची सर्व कामे पूर्ण करून घ्यावीत, असा सल्ला देण्यात आला आहे.

अनेक राज्यांत जोरदार पाऊस
सध्या हिमाचल प्रदेशपासून पश्चिम बंगालपर्यंत आणि ईशान्येपासून ओडिशा आणि राजस्थानपर्यंत पावसाचा कहर सुरूच आहे. हिमाचल प्रदेशातील ६ जिल्ह्यांमध्ये सोमवारी मुसळधार पाऊस झाला. तर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. झारखंडमध्येही मुसळधार पाऊस झाला. हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पाऊस आणि भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्गासह 74 रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *