![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ सप्टेंबर ।। दहीहंडी उत्सवामध्ये धोकादायक लेझर लाइटवर पोलिस आयुक्तांनी बंदीचे आदेश काढले होते. मात्र काही मंडळांनी या आदेशाला हरताळ फासला. त्यामुळे डोळ्यांना इजा झाल्याच्या तक्रारी घेऊन रुग्ण आल्याचे नेत्ररोगतज्ज्ञांनी ‘एका वृत्तवाहिनीशी ’ बोलताना सांगितले. यंदाच्या गणेशोत्सव मिरवणुकीमध्येही लेझर लाइटचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लेझर लाइट थेट डोळ्यांवर पडल्यास डोळ्यांना गंभीर दुखापत होऊन कायमस्वरूपी दृष्टिदोष होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा नेत्ररोगतज्ज्ञांनी दिला आहे.
‘अलीकडे उत्सव, मिरवणुकांमध्ये ‘लेझर शो’चे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडू शकते. साउंड सिस्टमच्या जोडीला ‘लेझर शो’चा सर्रास वापर हल्ली बघायला मिळतो. लेझर लाइटमुळे डोळ्यांना गंभीर दुखापत होऊन कायमस्वरूपी दृष्टिदोष होण्याची शक्यता असते. यापूर्वी नेत्रपटलाच्या मध्यभागी सूज येणे अथवा रक्तस्राव होणे, असे रुग्ण माझ्याकडे आलेले आहेत. त्यामुळे यासंदर्भात काळजी घेणे आवश्यक असल्याचे नेत्ररोगतज्ज्ञ म्हणाले .
मिरवणुकीत नागरिकांनी लेझर किरणांकडे उघड्या डोळ्यांनी पाहू नये. यामुळे नेत्रपटलाजवळ असलेल्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांतून रक्तस्राव होतो आणि दृष्टिदोष निर्माण होतो. काही वेळा कायमचे अंधत्व येण्याचा धोका असतो. लेझर लाइटमुळे डोळ्यांस त्रास झाल्यास नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्याने ताबडतोब उपचार करावा, असे नेत्ररोगतज्ज्ञांनी सांगितले आहे.
ही आहेत लक्षणे
बुबुळांवर जखम होणे
प्रकाश सहन न होणे
दृष्टी क्षीण होणे
डोळ्यांतून पाणी येणे
अशी घ्या काळजी
लेझर लाइट पाच मिलीव्हॅटपेक्षा कमीचा असावा
लेझर लाइटपासून दूर राहणे
लेझर लाइट थेट डोळ्यांत जाणार नाही, याची काळजी घेणे
लहान मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक
लेझर लाइटचा झोत आकाशाच्या दिशेने असावा
‘लेझर शो’ची नोंदणी व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची सक्ती करावी
