![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ सप्टेंबर ।। पुणेकरांना यंदाच्या गणेशोत्सवामध्ये बाप्पा पावला. कारण पुण्याला पाणीपुरवठा करणारी चारही धरणं तुडुंब भरली आहेत. या चारही धरणांत १०० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांचा वर्षभरासाठीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. त्याचसोबत संपूर्ण पुणे जिल्ह्याला देखील पाणीपुरवठा करणारी जवळपास सर्वच धरणं काठोकाठ भरली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चार ही धरणं फुल्लं भरली आहेत. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरणं १०० टक्के भरली आहेत. पुणे जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ७ टक्के जास्त पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात चार ही धरणांमध्ये मिळून ९३.६२ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला होता.
दुसरीकडे, पुणे जिल्ह्यामध्ये २६ धरणं आहेत. या सर्व धरणांपैकी बरीच धरणं १०० टक्के भरली आहेत. फक्त ३ धरणं ८० टक्क्यांपेक्षा कमी भरली आहेत. या २६ धरणांमध्ये मिळून सध्या १९८.३२ टीएमसीपैकी १९५.९९ टीएमसी म्हणजेच ९८ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे यंदा पुणे जिल्ह्यातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
पुण्यामध्ये गेल्या दोन महिन्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराला आणि जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी सर्वच धरणं चांगली भरली. मागच्यावर्षीच्या तुलनेमध्ये यंदा या सर्वच धरणांमध्ये जास्त पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे यावर्षी पुणे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी बाप्पा पावला असल्याचे म्हटले जात आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील वर्षभराचे पाणी टेन्शन मिटलं आहे.