महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ सप्टेंबर ।। पहिल्या भागाच्या यशानंतर ‘धर्मवीर 2’ची (Dharmaveer 2) उत्सुकता सर्वांनाच लागली होती. आता ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हे ब्रीद वाक्य घेऊन ‘धर्मवीर 2’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘धर्मवीर-2’ हा चित्रपट 9 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, त्यावेळी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं होतं. आता अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यावर धर्मवीर 3 चित्रपटाची पटकथा मी लिहिणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) गंभीर आरोप केलाय.
संजय राऊत म्हणाले की, धर्मवीरांची व्याप्ती काय होती हे आम्हाला माहिती आहे. ते फडणवीसांना माहीत नाही आणि एकनाथ शिंदेंना देखील माहित नाही. आनंद दिघे हे काय होते हे आम्हाला माहिती आहे. ते ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते. त्यांना आता भारतीय जनता पक्षाच्या मदतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या वर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण बाळासाहेब ठाकरेंचे जे महाराष्ट्रात पसरलेले लाखो लोक आहेत ते एकनाथ शिंदे यांना मानत नाहीत. त्यामुळे अशा सिनेमाच्या माध्यमातून एक नवीन प्रतिक निर्माण करायचे काम सुरु असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
…तर असे सिनेमे काढण्याची वेळ आली नसती
ते पुढे म्हणाले की, आनंद दिघे हे निष्ठावंत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, पदाधिकारी होते. सर्वसामान्यांच्या मदतीला ते सतत पुढे जायचे. दुर्दैवाने त्यांचा अकाली मृत्यू झाला. एकनाथ शिंदेंपेक्षा राजन विचारे आणि अनेक लोक दिघे साहेबांच्या अत्यंत जवळ होते. तेव्हा धर्मवीरांवर काल्पनिक कथेनुसार पडद्यावर सिनेमे आणण्यापेक्षा तुम्ही शिवसेनेची प्रतिष्ठा जपली असती तर तुम्हाला असे सिनेमे काढण्याची वेळ आली नसती. आनंद दिघे यांना आम्ही जास्त ओळखायचो. धर्मवीर यांचा एका सिनेमात त्यांचा मृत्यू दाखवलेला आहे. आता धर्मवीर दोन काढत आहेत, धर्मवीर तीन काढताय, धर्मवीर विचार काढताय. हे काय अमर अकबर अँथनी सिनेमा काढताय का? खरं म्हणजे गोलमाल वन, गोलमाल टू आणि गोलमाल थ्री असा सिनेमा यांच्यावर काढला पाहिजे, असा टोला देखील संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना लगावला.
संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर टीका
देवेंद्र फडणवीस धर्मवीर तीन काढत आहेत. त्यांना काय धर्मवीर माहितीय? त्यांनी औरंगजेबावर सिनेमा काढला पाहिजे. महाराष्ट्र लुटायला दिल्ली आणि गुजरातमधून जे नवीन अफजलखान आणि औरंगजेब येत आहे त्यांनी त्यांच्यावर सिनेमा काढला तर नक्कीच त्यांची चर्चा होईल, अशी टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.