Good News : चऱ्होलीच्या शहरीकरणावर पोस्ट विभागाचा ‘स्टॅम्प’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ ऑक्टोबर ।। चऱ्होली बुद्रुक येथे पोस्ट डाक सुविधा सक्षम करण्यासाठी डाक विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या भागातील पोस्ट शाखेचा पूर्वी ग्रामीण पिन कोड होता. त्यामध्ये बदल करुन नवीन शहरी पिनकोड कार्यान्वयीत केला आहे. त्यामुळे पोस्ट सेवांमध्ये वाढ होणार असून, चऱ्होली आणि परिसरातील पोस्ट ग्राहकांना फायदा होणार आहे. विशेष म्हणजे, आता चऱ्होलीच्या शहरीकरणावर पोस्ट विभागाने शिक्कामोर्तब केले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये १९९७ चऱ्होली बुद्रुकचा समावेश करण्यात आला. त्यानंतर २०१७ पर्यंत या गावात पायाभूत सोयी-सुविधा अपक्षेप्रमाणे विकसित झाल्या नाहीत. २०१७ नंतर झालेल्या विविध विकास प्रकल्प आणि मूलभूत सोयी-सुविधांमुळे चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर विकसित झाला.

आमदार महेश लांडगे यांनी समाविष्ट गावांमध्ये महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाला चालना दिली. त्यामुळे लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून, विविध गृहप्रकल्प विकसित झाले आहेत. मात्र, पोस्ट ऑफीसचा कारभार ग्रामीण पिन कोडच्या माध्यमातूनच सुरू होता. किंबहुना चऱ्होली आणि परिसरातील पोस्ट ग्राहकांना महत्त्वाच्या व्यवहाराकरिता आळंदी येथे जावे लागत होते. त्यामुळे चऱ्होलीतील पोस्ट कार्यालयाला वितरण उप डाकघरचा दर्जा मिळावा आणि त्यादृष्टीने विविध सेवा सुरू कराव्यात, यासाठी आमदार लांडगे यांनी पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले आहे.

चऱ्होली बुद्रुक पोस्ट कार्यालयाचा पूर्वी पिन कोड- 412 105 असा होता. सदर पिन कोड ग्रामीण भागाचा आहे. आता 411 081 हा शहराचा पिन कोड मिळाला असून, लवकरच कार्यान्वयीत होणार आहे. त्यामुळे वितरण उप डाकघर डिलिव्हरी पोस्ट ऑफीस सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे डाक खात्याच्या सुविधा त्वरीत उपलब्ध होतील. पोस्टमनची संख्या वाढेल. जास्तीत जास्त सेवा घरपोच देण्यासाठी मदत होईल. पोस्ट ग्राहकांना पूर्वी आळंदीला जावे लागत होते. मात्र, आता टपालगाडी चऱ्होलीपर्यंत येणार आहे. आर्थिक व्यवहारासाठी आळंदीला जावे लागणार नाही.

महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये विकासाला चालना देतानाच शासकीय सोयी-सुविधा उपलब्ध करण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. सर्वसामान्य नागरिकांना भारतीय पोस्ट विभागाच्या विविध योजनांचा लाभ व्हावा. यासह पोस्ट ग्राहकांचे आर्थिक व्यवहार सुलभ व्हावेत. या करिता चऱ्होली आणि परिसरात पोस्ट विभागाच्या कार्यालयात उप डाकघर सुरू व्हावे. या करिता मागणी केली होती. त्याला भारतीय पोस्ट विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सदर सेवा सक्षमपणे राबवावी आणि अधिकाधिक नागरिकांना त्याला लाभ व्हावा, अशी अपेक्षा आहे.

– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *