महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ ऑक्टोबर ।। महाराष्ट्रात तत्त्वांचे राजकारण राहिलेले नाही. कोणी कोणत्याही पक्षातून कुठेही उड्या मारत आहेत. गेल्या ७५ वर्षांत आपल्यापुढील प्रश्न बदललेले नाहीत. राज्यात बदल हवा असेल, तर स्वराज्य पक्षाला सत्तेत आणा, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी (दि. १५) नाशिकमध्ये केले. विधानसभा जिंकण्यासाठीच स्वराज्य पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरला असून, नाशिकमधून निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले. गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात स्वराज्य संकल्प मेळावा घेण्यात आला. यामध्ये संभाजीराजे छत्रपती बोलत होते.
स्वराज्य पक्षाला मान्यता मिळाल्यानंतरचा पहिलाच मेळावा नाशिकमध्ये घेण्यात आला. शहरातून संभाजीराजे छत्रपती यांची रॅली काढण्यात आली. यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संभाजीराजे म्हणाले, की ‘आपल्या संघटनेला पक्षाचा दर्जा मिळाला असून, निवडणूक आयोगाने पेनाचे निब हे निवडणूक चिन्ह आपल्याला बहाल केले आहे. आपल्याला हे चिन्ह कसे मिळाले याबाबत प्रस्थापित राजकीय पक्ष आश्चर्य व्यक्त करीत आहेत. परंतु, पेनाचे निब हेच आता हत्यार बनवून स्वराज्य पक्ष निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी नाशिकमधून केली. स्वराज्यचा अर्थच स्वत:चे राज्य असा होतो. हे राज्य विद्यार्थी, महिला, कष्टकरी, बारा बलुतेदार असे सर्वांचे आहे. गेल्या ७५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अत्यंत घाणेरडे राजकारण राज्यात सुरू आहे. खुर्चीसाठी कशाही उड्या मारायच्या व काहीही करून खुर्चीत बसायचे एवढा एकच अजेंडा सध्या सुरू असून, या उड्या थांबविण्यासाठीच स्वराज्य पक्ष निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला ही गद्दारी असेल, तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करणे ही सुद्धा गद्दारीच होती, अशी टीका त्यांनी यावेळी केली. सहकार क्षेत्र, साखर कारखाने, शिक्षण संस्था, रुग्णालये प्रस्थापित पक्षांच्या राजकीय नेत्यांच्या हातात आहेत. तरीही आपल्याला मुलभूत सुविधांसाठी भांडावे लागते. इतक्या वर्षात प्रस्थापितांना सुसंस्कृत महाराष्ट्र का घडविता आला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आमदार, खासदारांना जाब विचारा
नाशिक सुवर्ण त्रिकोणात असले तरी येथील विकास झाला नाही. येथून दरवर्षी ६५ ते ७० हजार विद्यार्थी बाहेर पडतात. त्यांना रोजगार कुठे मिळतो आहे? एकही नवीन उद्योग या शहरात व जिल्ह्यात आलेला नाही. स्मार्ट सिटी खड्ड्यांत गेली आहे. पर्यटन वाढीसाठी ठोस काही होताना दिसत नाही. याबाबत आमदार, खासदारांना जाब विचारा, असे आवाहन संभाजीराजे यांनी नाशिककरांना केले.