महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ऑक्टोबर ।। घरात काम करणाऱ्या महिलेने स्वयंपाकघराच्या भांड्यांमध्ये लघवी करत त्यामध्येच भाकरी बनवल्याचा संतापजनक आणि तितकाच किळसवाणा प्रकार समोर आला आहे. उत्तरप्रदेशच्या गाझियाबादमध्ये ही भयंकर घटना घडली आहे. या प्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गाझियाबादच्या क्रॉसिंग रिपब्लिक भागात एका महिलेने तिच्या घरगुती नोकरावर गंभीर आरोप केले आहेत. महिलेने तिच्या कामाच्या स्वयंपाकावर स्वयंपाकघरातील भांड्यात लघवी करत त्याच लघवीने भाकरी बनवल्याचा मोठा आरोप केला आहे. याप्रकरणी महिलेने क्रॉसिंग रिपब्लिक पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. ही घटना ऐकून स्थानिक लोक आणि पोलिसही हादरुन गेले.
महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, तिची घरगुती नोकर रीना गेल्या आठ वर्षांपासून तिच्या घरात काम करत होती. 14 ऑक्टोबर रोजी महिलेने किचनमधील काही संशयास्पद हालचाली तिच्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केल्या. व्हिडिओमध्ये रीना एका भांड्यात लघवी करताना आणि नंतर त्याच लघवीने रोट्या बनवताना दिसत आहे. या घटनेने महिलेच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तसेच तिच्या कुटुंबातील सदस्यांची प्रकृती काही काळापासून खालावली आहे, विशेषत: यकृताशी संबंधित समस्या उद्भवत असल्याचेही या महिलेने म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करत असून गरज भासल्यास आरोपींचीही चौकशी केली जाईल, असे स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणाले. सर्व शक्य बाबी लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास करणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.