महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑक्टोबर ।। गुगलने आपल्या युजर्ससाठी स्वस्तात विमान प्रवासाची सोय आणली आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांना कमी खर्चात प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी गुगल फ्लाइट्सने ‘Cheapest’ नावाची नवीन सर्च फिल्टर सुविधा जाहीर केली आहे. यामुळे प्रवाशांना आता विमान प्रवासाचे स्वस्त पर्याय शोधणे आणखी सोपे होणार आहे. या नवीन फीचरमुळे आता गुगल फ्लाइट्सवर ‘Best’ आणि ‘Cheapest’ असे दोन पर्याय उपलब्ध असतील, ज्यातून युजर्स त्यांच्या सोयीने प्रवासाचे तिकीट बुक करू शकतील.
नवीन ‘Cheapest’ सर्च फिल्टरमुळे प्रवाशांना किफायतशीर प्रवासाची संधी मिळेल. गुगलने याला ‘क्रिएटिव्ह आयटिनेररीज’ असे संबोधले आहे, जे प्रवाशांना पारंपरिक प्रवास योजनांपेक्षा वेगवेगळे आणि स्वस्त पर्याय शोधण्याची संधी देते. हे स्वस्त पर्याय ओळखण्यासाठी त्यांच्या किंमती हिरव्या रंगात दर्शविल्या जातील. त्यामुळे कमी किमतीत प्रवास करायचा असल्यास हे पर्याय सहज दिसतील.
स्वस्त दर मिळविण्यासाठी लांबचा थांबा असणाऱ्या फ्लाइट्सचा वापर केला जाऊ शकतो. यामध्ये ‘सेल्फ ट्रान्स्फर’ सारख्या संकल्पना देखील लागू होऊ शकतात, ज्यात प्रवाशांना आपले सामान स्वतःच गोळा करून पुढील फ्लाइटसाठी पुन्हा चेक इन करावे लागते.
जबरदस्त डिस्काउंट
एकाच फ्लाइटमध्ये ट्रान्स्फर होण्याऐवजी, वेगवेगळ्या फ्लाइट्स बुक केल्यास या प्रकारच्या पर्यायांमधून बऱ्याच वेळा स्वस्त दर मिळू शकतो. गुगल फ्लाइट्स युजर्सना त्यांच्या प्रवासाच्या इटिनेररीमध्ये महत्वाच्या सूचना दर्शवू लागले आहेत. प्रवाशांनी वेगवेगळ्या फ्लाइट्स बुक केल्यास “Separate tickets booked together” अशा सूचनाही देण्यात येतील. अशा प्रकारच्या प्रवासात युजर्सना अतिरिक्त काळजी घेण्याची आवश्यकता असू शकते, त्यामुळे रेड वार्निंग मॅसेजसुद्धा देण्यात येईल, ज्यामुळे संभाव्य धोके लक्षात येतील.
हा नवीन ‘Cheapest’ पर्याय पुढील दोन आठवड्यांत सर्व युजर्ससाठी जागतिक स्तरावर उपलब्ध होईल. कमी खर्चात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे, कारण ती विशेषतः खर्चावर नियंत्रण ठेवणाऱ्यांसाठी तयार केली आहे.