भोसरीकरांचा तुम्ही अपमान केला; आमचा स्वाभिमान दुखावला!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑक्टोबर ।। ‘‘१० वर्षांत काय केले?’’ असा प्रश्न विचारणाऱ्यांना मी सांगणार आहे. शास्तीकर सरसकट माफ झाला आणि तुम्ही व तुमचे कुटुंबीय त्याचे लाभार्थी आहेत. आतापर्यंत मी कुणाचे नाव घेतले नाही. मात्र, आता भर चौकात नाव घेवून सांगणार कुणाचा किती शास्तीकर माफ झाला. ‘भोसरीत राहण्याची लाज वाटते’ असा आरोप तुम्ही केला. त्यामुळे आम्हा भोसरीकरांचा स्वाभिमान दुखावला आहे. मी माफ केले असते. पण, माझ्या भोसरी गावचे नाव बदनाम करायला नको होते, असे टिकास्त्र आमदार महेश लांडगे यांनी सोडले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भोसरी गावठाण येथील महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या मैदानावर निवडणूक नियोजनाबाबत भोसरीतील ग्रामस्थ व सहकाऱ्यांची बुधवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीचे सभेत रुपांतर झाले.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, आपण राजकारणात आहोत. तुम्ही मला बदनाम करा. मात्र, एव्हढी पातळी सोडू नका. ज्या गावात आपण राहतो. त्या गावाला बदनाम करु नका. आपण ज्या संस्कारात, विचारांत वाढतो. त्याचा अनादर करु नका. कुठेही बोलताना भोसरीबद्दल आपल्याला आदरच पाहिजे. भोसरी माझा स्वाभिमान आहे. माझ्या स्वाभिमानाला कोणी धक्का लावेल, तर त्याला जश्यास तसे उत्तर देणार आहे.

निवडणूक जिंकायची म्हणून घाणेरडे राजकारण सुरू आहे. भोसरीच्या मातीत समोरच्याला उचलून टाकणारे पैलवान तयार होतात. समोरच्याला चावणारे नाही. मलाही लाज वाटते, तुमच्यासारखी माणसे भोसरीत जन्माला आली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचार संहिता सुरू झाली. ज्या गावातून माझ्या सामाजिक-राजकीय वाटचालीची सुरूवात झाली. त्या ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या आशिर्वादाने माझ्या गावातील सर्व सहकारी, आप्तेष्ट यांनी निवडणूक प्रचार तयारी आणि जबाबदारी याबाबत बैठकीचे नियोजन केले. या बैठकीला अक्षरश: सभेचे स्वरुप प्राप्त झाले. ‘‘एका हाकेवर जमा होणारी ही जीवाभावी माणसं…’’ हीच माझी ताकद आहे.

– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

विकासाच्या मुद्यांवर निवडणूक लढवणार…
‘‘१० वषे निरंतर विश्वासाची… शाश्वत विकासाची’’ या घोषवाक्याच्या आधारे आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. आम्ही केलेली विकासकामे, राबवलेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात माझे सहकारी, पदाधिकारी यांची झालेली अडवणूक आणि रखडलेले प्रकल्प यासह महायुती सरकारच्या सत्ताकाळात मार्गी लावलेले प्रकल्प अशा या मुद्यांच्या आधारे आम्ही लोकांसमोर ‘रिपोर्ट कार्ड’ घेऊन माय-बाप जनतेसमोर जाणार आहोत, असा संकल्प या बैठकीत करण्यात आला आहे, असेही आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *