‘तेल कुठून घ्यायचं हे भारत ठरवेल!’ रशियन तेलावरून भारताचा अमेरिकेला स्पष्ट संदेश

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०७ मार्च २०२६ ।। अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव वाढला असून होर्मुझ सामुद्रधुनीभोवतीची परिस्थिती अधिकच संवेदनशील बनली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक तेल बाजारातही अस्थिरता निर्माण झाली आहे. दरम्यान, रशियाकडून तेल खरेदीबाबत अमेरिकेकडून भारतावर दबाव टाकला जात असल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर भारताने आपली भूमिका ठामपणे मांडत स्पष्ट संदेश दिला आहे. भारत आपली ऊर्जा गरज लक्षात घेऊन जिथे स्वस्त आणि फायदेशीर दर मिळतील तिथून तेल खरेदी करेल, त्यासाठी कोणत्याही देशाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे रशियन तेलाच्या मुद्द्यावर भारताने आपली स्वायत्त भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

केंद्र सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, होर्मुझ सामुद्रधुनीवर तणाव वाढत असला तरी भारताचा ऊर्जा पुरवठा सुरक्षित आणि स्थिर आहे. भारताने कच्च्या तेलाचे स्रोत मोठ्या प्रमाणावर विविधीकृत केले असून सध्या २७ ते ४० देशांकडून तेल आयात केले जाते. त्यामुळे कोणत्याही एका देशावर अवलंबून राहण्याची वेळ भारतावर येत नाही. राष्ट्रीय हित लक्षात घेऊन भारताला जिथे सर्वोत्तम आणि कमी किमतीत तेल उपलब्ध होईल, तिथून खरेदी केली जाईल, अशी भूमिका सरकारने स्पष्ट केली आहे. रशियाकडून तेल आयात करणे सुरू ठेवले जाईल आणि अशा व्यवहारांसाठी भारताला कोणाच्याही परवानगीची गरज नाही, असेही सरकारने ठामपणे नमूद केले आहे.

रशिया-युक्रेन युद्धानंतर गेल्या तीन वर्षांत अमेरिका आणि युरोपियन देशांच्या आक्षेपांनंतरही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली आहे. सवलतीच्या किमती आणि देशांतर्गत रिफायनरींची मागणी यामुळे २०२२ नंतर रशियन तेल आयातीत लक्षणीय वाढ झाली. फेब्रुवारी २०२६ पर्यंत रशिया हा भारताचा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार राहिला आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार भारताकडे सध्या २५० दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त कच्च्या तेलाचे आणि पेट्रोलियम पदार्थांचे साठे उपलब्ध आहेत, जे सुमारे सात ते आठ आठवड्यांच्या वापरासाठी पुरेसे आहेत. भारताची एकूण तेल शुद्धीकरण क्षमता दरवर्षी २५८ दशलक्ष मेट्रिक टन इतकी असून ती देशाच्या सध्याच्या मागणीपेक्षा अधिक आहे. दरम्यान, इराणविरुद्ध अमेरिका-इस्रायलच्या कारवाईनंतर आखाती भागातील तणाव वाढल्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी आणि जहाज वाहतूक मार्गांवर परिणाम झाला असून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतींमध्येही झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *