महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑक्टोबर ।। भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात न्यूझीलंडचे गोलंदाज भारतीय संघावर भारी पडल्याचे पाहायला मिळाले आहे. अवघ्या ३४ धावांवर भारताचे ६ फलंदाज तंबूत परतले आहेत. यादरम्यान भारतीय संघाच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
भारतीय संघाची फ्लॉप सुरुवात
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चुकीचा ठरला. कारण ढगाळ वातावरणाचा न्यूझीलंडच्या गोलंदाजांना चांगलाच फायदा झाला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांचे उसळी घेणारे चेंडू, भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकत होते. रोहित शर्मा अवघ्या २ धावांवर माघारी परतला. रोहित पाठोपाठ विराट कोहली आणि सरफराज खानला तर खातेही उघडता आले नाही.
– Duck for Kohli.
– Duck for Sarfaraz.
– Duck for Rahul.
– Duck for Jadeja
– 2 runs for Rohit.
– 16 runs for Jaiswal.INDIA 34 FOR 6 AT CHINNASWAMY STADIUM 🤯 pic.twitter.com/VE7vUJRPu8
— Johns. (@CricCrazyJohns) October 17, 2024
सरफराज – जयस्वालचा डाव सावरण्याचा प्रयत्न
सुरुवातीला ३ मोठे धक्के बसल्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि सरफराज खानने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र २१ धावा जोडल्यानंतर यशस्वी जयस्वालने १३ धावांवर पॅव्हेलियनची वाट धरली. त्यानंतर केएल राहुल आणि रविंद्र जडेजा या दोघांनाही खातं उघडता आलं नाही. तर रिषभ पंत अजूनही क्रिझवर आहे.
भारतात खेळताना पहिल्यांदाच असं घडलं
या सामन्यातील पहिला डाव हा भारतीय फलंदाजांसाठी वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हता. कारण गेल्या १४७ वर्षांच्या इतिहासात कधीच घडलं नव्हतं, ते या सामन्यात घडलं आहे. भारतात कसोटी क्रिकेट खेळताना पहिल्यांदाच टॉप ७ पैकी ४ फलंदाज शून्यावर बाद होऊन माघारी परतले आहेत.
यासह २१ व्या शतकात, तिसऱ्यांदाच भारतीय संघातील टॉप ६ फलंदाजांपैकी ३ फलंदाज शून्यावर माघारी परतले आहेत. यापूर्वी २०१४ आणि २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात भारताचे ६ पैकी ३ फलंदाज शून्यावर माघारी परतले होते.