महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ ऑक्टोबर ।। बारामती विधानसभेत अजित पवारविरुद युगेंद्र पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागू आहे. मात्र आपल्या विरोधात उमेदवार देण्यावरून अजित पवार संतापले असून त्यांनी थेट शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केलीय. यामुळे आता पवारविरुद्ध पवार वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.
आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बारामतीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अजित पवारांनी बारामतीत मोठं शक्तीप्रदर्शन केलं. दुसरीकडे अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. युगेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: शरद पवार उपस्थित होते. लोकसभेच्या निवडणुकीनंतर बारामतीत पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार असा सामना होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली होती.
सुप्रिया सुळे यांच्याविरुद्धात उमेदवार दिल्याने घरात फूट पडल्याचं टीका अजित पवार यांच्यावर केली जात होती. आता विधानसभेत शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना उमेदवारी देऊन अजित पवार यांची चिंता वाढवलीय. बारामतीत होणाऱ्या काका आणि पुतण्यामधील लढतीवरून अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केलीय.
आमची तात्यासाहेब पवारांची फॅमिली कष्टातून पुढे आलीय. वडिलांनंतर आईने कष्ट करून कुटुंब उभे केलं. ती कुटुंबाला सांगत होती की माझ्या दादाच्या विरोधात उभे राहू नका. तरीही उमेदवार दिला, मग आता साहेबांनी तात्यासाहेबांचे घर फोडलं असं म्हणायचं का? या शब्दात अजित पवारांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांवर घणाघाती हल्ला केला. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अजित पवार यांनी कन्हेरी येथील मारुतीचं दर्शन घेत आपल्या प्रचाराची सुरुवात केली.
आई सांगतेय की माझ्या दादाविरोधात उमेदवार देवू नका. हे जे काही ज्या पद्धतीने चाललेय ते बरोबर नाही, असे अजित पवार म्हणाले. कुटुंबातील मोठ्या व्यक्तिनीं तरी सांगायला पाहिजे होते. आता जे घडतेय त्यावरून साहेबांनी आमचे तात्यासाहेबांचे घर फोडले असे म्हणायचे का? मी जीवाला जीव देणारा माणूस आहे.
पण या सगळ्या संदर्भात इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आणू नका. एकोपा ठेवायला पिढ्यानपिढ्या जातात, तुटायला वेळ लागत नाही,असं अजित पवार यावेळी म्हणाले. घरातील भांडण चार भिंतीच्या आत ठेवायचे असते. त्यात एकदा दरी पडली की सांधायला दुसरे कोणी येत नाही. सगळ्यांनी एकोप्याने राहिले तर घर पुढे जाते.