उष्णतेच्या लाटांसह यंदाचा उन्हाळा कडक; तीन महिन्यांसाठी हवामान विभागाचा अंदाज काय?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ मार्च । यंदा उन्हाळ्याची तीव्रता जास्त जाणवणार आहे. मार्च ते मे या तीन महिन्यांत देशभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले जाण्याची, तर महाराष्ट्रासह दक्षिणेतील राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मार्च ते मे या कालावधीसाठीच्या हवामानाचा अंदाजाची पत्रकार परिषदेत माहिती दिली. पॅसिफिक महासागरात एल निनो स्थिती सक्रिय होण्यास गेल्या वर्षी सुरुवात झाली होती. तसेच ही स्थिती मेपर्यंत कायम राहण्याचा अंदाज जागतिक प्रारूपांकडून वर्तवण्यात आला होता. त्यानुसार आता एल निनोची तीव्रता कमी होऊ लागली आहे. एल निनो मोसमी पावसाच्या सुरुवातीला संपुष्टात येईल. हिंदी महासागरातील इंडियन ओशन डायपोल हा वातावरणीय घटक मार्च ते मे या काळात तटस्थ होईल, असे डॉ. महापात्रा यांनी सांगितले.

एल निनोची तीव्रता आता कमी होऊ लागली असली, तरी त्याचा परिणाम तापमान वाढण्यावर होणार आहे. त्यामुळे मार्च ते मे या कालावधीत तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा सरासरीपेक्षा जास्त येऊ शकतात. महाराष्ट्र, ओडिशा यांच्यासह दक्षिणेतील तेलंगणासारख्या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटा येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे डॉ. महापात्रा यांनी स्पष्ट केले.

मार्चमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता
देशभरात मार्चमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचाही अंदाज आहे. सन १९७१ ते २०२० या कालावधीत देशभरातील मार्चमधील पावसाची सरासरी २९.९ मिलीमीटर आहे. त्यामुळे यंदा मार्चमध्ये सरासरीच्या ११७ टक्के पावसाची शक्यता आहे. तसेच मार्चमध्ये उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे, असे डॉ. महापात्रा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *