प्रचाराचे रणशिंग फुंकले ; निवडणुकीची धामधूम सुरू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ नोव्हेंबर ।। उमेदवारी माघारीची मुदत संपल्यानंतर राज्यातील प्रचारसभांचे रणशिंग सर्वच प्रमुख पक्ष व नेत्यांनी फुंकले आहे. मंगळवारी राज्यभरात विविध ठिकाणी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या सभा झाल्या. ‘मविआ’ आणि महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून झाला. दरम्यान, बुधवारी महाविकास आघाडीची मुंबईत प्रचारसभा होणार आहे.

कोल्हापुरात मंगळवारी महाविकास आघाडी आणि महायुती आमने-सामने आली होती. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, तर दुसरीकडे महायुतीची प्रचारसभाही आयोजित करण्यात आली. महायुतीच्या प्रचारसभांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी संबोधित केले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी बारामतीत प्रचाराचे रणशिंग फुंकले. शिवसेना (ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर राज्यात पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आपल्या प्रचाराचा मंगळवारी शुभारंभ केला. फडणवीस यांनी प्रचाराचा धडाका लावला असून, राज्यभरात फडणवीस हे 6 दिवसांमध्ये 21 सभांना संबोधित करणार आहेत.

बुधवारी ‘मविआ’ची सभा
काँग्रेस व महाविकास आघाडीतर्फे बुधवारी प्रचाराचे रणशिंग फुंकले जात आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उद्या, बुधवारी महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येत असून, नागपुरात दुपारी 1 वाजता ‘संविधान सन्मान संमेलनाला’ ते उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानात ‘मविआ’ची ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’ होणार असून, या सभेत विधानसभा निवडणुकासाठी काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी जाहीर करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे.

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातार्‍यात प्रचारसभेस संबोधित केले. शिंदेंनी रविवारी, 3 तारखेलाच आपल्या प्रचाराचा नारळ कुर्ला येथे फोडला होता. सातार्‍यात बोलताना त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. गहाण ठेवलेले धनुष्यबाण चिन्ह आम्ही सोडवले. राज ठाकरे यांनी धनुष्यबाण चिन्हावर एकनाथ शिंदे यांचा अधिकार नाही, असे म्हटले होते.

फुकट गोष्टी मिळणार नाहीत
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी यवतमाळ येथील सभेत बोलताना महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेवर टीका केली. ‘उद्या माझे सरकार आल्यानंतर असल्या कोणत्याही फुकट गोष्टी मिळणार नाहीत,’ असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *