महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.७ नोव्हेंबर ।। विधानसभा निवडणुकीतील अनेक रंगतदार लढतींकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. नात्यागोत्यातील सामनेही लक्षवेधी ठरत आहेत. पवार काका-पुतण्यामधील सामना जितका रंजक आहे, तितकाच ठाकरे कुटुंबातील एकमेकांविरोधातील अप्रत्यक्ष मुकाबलाही. वरळीत आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेने उमेदवार दिला आहे, तर माहीममध्ये अमित ठाकरे यांच्या विरोधात ठाकरे गटाचा उमेदवार आहे. परंतु माहीममध्ये ठाकरे कुटुंबाच्या एका कृत्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भाजप कुणाच्या पाठीशी?
माहीममध्ये महायुतीकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर पुन्हा रिंगणात आहेत. सरवणकरांवर माघारीसाठी भाजपकडून प्रचंड दबाव आल्यानंतरही ते मागे हटले नाहीत. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट विरुद्ध मनसे अशी तिरंगी लढत निश्चित आहे. आता भाजपने आपला पाठिंबा महायुतीतील शिवसेनेला जाहीर केला आहे, मात्र छुपी ताकद अमित ठाकरेंच्या पाठीशी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माहीममध्ये प्रचारसभा नाही
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माहीममध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रचारसभांचे वेळापत्रक समोर आले आहे. मात्र माहीम मतदारसंघात ठाकरे पितापुत्रांपैकी कोणाचीही तोफ धडाडणार नसल्याचे समोर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्कसारखे ठाकरे कुटुंबासाठी महत्त्वाचे मैदान असतानाही तिथे त्यांनी प्रचारसभा घेणं टाळल्याचं दिसत आहे.
