TCS महिनाभरात जॉईन करा; मिळवा घाऊक फायदा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ मार्च ।। देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेली टीसीएस वरिष्ठ कर्मचाऱ्यांची भरती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी एजंट कंपन्यांना (vendors) विशेष फायदे देत आहे. १५.२ ट्रिलियन बाजारमूल्य असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आणलेल्या ‘क्विक जॉइनर इन्सेंटिव्ह प्लॅन’ योजनेंतर्गत ३० दिवसांपेक्षा कमी कालावधीत कंपनीत रुजू होणाऱ्यांना प्रति कर्मचारी ४० हजार रुपये ऑफर करीत आहे. अनुभवी कर्मचारी मिळविण्यासाठी कंपन्यांची ही धडपड सुरू असल्याचं आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे. मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनी १० ते १५ वर्षांचा अनुभव असलेल्या लोकांना त्यांच्या कौशल्यानुसार प्रोत्साहन देत आहे. मात्र, नोकरीत रुजू झाल्यापासून १८० दिवसांच्या आत कर्मचारी निघून गेल्यास ते वसूल केले जाणार आहे. टीसीएसने एजंट कंपन्यांद्वारे (vendors) त्वरित कर्मचारी नियुक्त करण्यासाठी विशेष लाभ देणे हे आयटी क्षेत्रात तेजीचे संकेत आहे.

टीसीएस चांगले कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा प्रोत्साहन भत्ता देत आहे. तसेच या नोकरीसाठी १० ते १५ वर्षांच्या अनुभवाची अटही ठेवण्यात आली आहे. परंतु कर्मचाऱ्यांनी रुजू होऊन १८० दिवसांच्या आत कंपनी सोडली तर ते कंपनी कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल करणार आहे, असंही टीसीएसने एजंट कंपन्यांना पाठवलेल्या मेलमध्ये म्हटलं आहे. गेल्या काही वर्षांत जागतिक चलनवाढ आणि व्याजदरात वाढ झाल्यामुळे मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यां (MNC)नी आयटीवरील खर्च कमी केला होता, त्यामुळे आयटी कंपन्यांना करार करण्यात अडचणी येत होत्या, मात्र महागाई कमी झाल्यामुळे परिस्थिती सुधारली असून, चित्र बदलत असल्याचं सांगितलं जात आहे.

कोणती कौशल्ये आवश्यक आहेत?
TCS पाठवलेल्या मेलनुसार, वेबसाइटवर मजकूर प्रकाशित आणि व्यवस्थापित करण्यासाठी कर्मचाऱ्याला Microsoft Teams, Microsoft 365, One Drive, Outlook आणि Endpoint आणि Sharepoint सारखे सॉफ्टवेअरचे ज्ञान असले पाहिजे. तसेच TCS देखील Endpoint आणि SharePoint मधील कौशल्यांच्या शोधात आहे, जे वापरकर्त्यांना वेबसाइटवर मजकूर तयार करण्यास आणि प्रकाशित करण्यास परवानगी देणार आहे.

पॅकेज किती असेल?
मिळालेल्या माहितीनुसार, TCS सारख्या कंपनीत १० ते १५ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी सरासरी पॅकेज ३० लाख रुपये प्रतिवर्ष आहे. साधारणपणे कर्मचाऱ्यांसाठी कंपनीकडून ८ ते १२ टक्के पॅकेज एजंट कंपन्यांना (vendors) दिले जाते. TCS चा अलीकडेच ब्रिटिश विमा कंपनी Aviva बरोबर १५ वर्षांचा करार झाला आहे. अविवा ही एक विमा कंपनी असून, ती ४५ वर्षांहून अधिक काळ विमा क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनी ५५ लाखांहून अधिक विमा पॉलिसी चालवते.

२०२२ मध्ये नोकरभरतीमध्येही अशाच पद्धतीच्या ऑफर देण्यात आल्या होत्या. परंतु ते वर्ष आर्थिक गुंतागुंतीचं राहिल्यानं अनेक कंपन्यांनी कपातीचं धोरण अवलंबलं होतं. परंतु आताची परिस्थिती वेगळी आहे. आयटी कंपन्यांना चांगले कौशल्य असणारे कर्मचारी हवे आहेत, जेणेकरून नवे प्रकल्प राबवण्यासाठी अनुभवी कर्मचारी उपलब्ध असतील, असंही वेंडर्स सांगतात. परंतु या सर्व प्रकरणावर टीसीएसने टिप्पणी करण्यास नकार दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *