महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ नोव्हेंबर ।। भारताच्या विकासाची ओळख ठरत असलेल्या नवीन सेमी हाय स्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेसने देशातील रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलला आहे. एकूण 108 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सध्या देशभरात 54 वेगवेगळ्या मार्गांवर धावत आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसच्या मोठ्या यशानंतर स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस गाड्याही लवकरच रुळावर येणार आहेत. वंदे भारत एक्सप्रेस सध्या देशातील प्रीमियम ट्रेनच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. वंदे भारतमध्ये सध्या प्रवाशांसाठी एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास या दोन वर्गांमध्ये प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
वंदे भारत एक्सप्रेसच्या चेअर कारमध्ये नवी दिल्ली ते वाराणसीचे भाडे 1805 रुपये आहे, तर एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला 3355 रुपये खर्च करावे लागतील. ही तिकीटाची मूळ किंमत आहे. याशिवाय तुम्हाला आरक्षण शुल्क, जीएसटी स्वतंत्रपणे भरावा लागेल. पण वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये बुक केलेले तिकीट रद्द केल्यावर किती कॅन्सलेशन चार्ज आकारला जातो हे तुम्हाला माहिती आहे का?
वंदे भारतची तिकीट रद्द केल्यास किती पैसे माघारी मिळतील?
बुक केलेले तिकीट रद्द केल्यावर रद्दीकरण शुल्क आकारण्यात येते. या कॅन्सलेशन चार्जमधून रेल्वे दरवर्षी कोट्यावधी रुपये कमवते. जर तुम्ही वंदे भारत एक्स्प्रेसच्या एसी चेअर कारमध्ये तिकीट बुक केले असेल आणि काही कारणास्तव तुम्हाला तिकीट रद्द करावे लागले, तर रेल्वे तुमच्याकडून तिकिटाच्या मूळ किमतीपासून 180 रुपये कॅन्सलेशन चार्ज आकारेल आणि उर्वरित रक्कम परत करेल. याशिवाय, जर तुम्ही वंदे भारत एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये तिकीट बुक केले असेल आणि रद्द करावे लागेल, तर तुमच्या तिकिटाच्या मूळ किमतीतून 240 रुपये कापले जातील.
जीएसटीचे पैसे परत मिळत नाहीत
तिकीट रद्द करताना तुम्हाला आरक्षण शुल्क आणि जीएसटी परत केला जात नाही. तिकीट रद्द केल्यावर, तिकीटाच्या मूळ किमतीतून रद्दीकरण शुल्क वजा केल्यावर उर्वरित रक्कम तुम्हाला परत केली जाते. भारतीय रेल्वे थर्ड क्लास एसी तिकिटावरही 180 रुपये कॅन्सलेशन चार्ज आकारते. स्लीपर क्लासचे तिकीट रद्द करण्यासाठी 120 रुपये आणि सामान्य वर्गाचे तिकीट रद्द करण्यासाठी 60 रुपये शुल्क आकारले जाते.