महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा इशारा ; तर या ठिकाणी थंडीची चाहूल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ नोव्हेंबर ।। नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा कडाका जाणवत असताना आता गेल्या दोन दिवसांपासून राज्यात थंडीमध्ये वाढ झाली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये थंडीचा कडाका जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं राज्यातील नागरिकांना आता थंडीचा आनंद लुटता येणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुरुवार ते रविवारदरम्यान मुंबईच्या तापमानात वाढ होईल. 20 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील वातावरणात गारवा राहणार आहे.

दिवाळी सुरू होताच थंडी जाणवायला लागते. मात्र, यंदा ऑक्टोबर महिना सरला तरीदेखील पावसाच्या सरी बरसत होत्या. नोव्हेंबरमध्येही राज्यातील काही जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पाऊस झाला. राज्यात काही ठिकाणी किमान तापमानाचा पारा खाली घसरण्यास सुरुवात झाली आहे. घाट माथ्यावर थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये बुधवारी 13.4 अंशावर पारा होता तर पुण्यात बुधवारी 14.6 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले होते.

राज्यातील काही भागांमध्ये थंडीचा कडाडा जाणवत आहे. काही भागांत अजूनही तापमान 20 अंशाच्यावर आहे. मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांचे तापमान 20 अंशाच्या खाली नोंदवले गेले आहे. राज्यात थंडीचा कडाका जरी जाणवत असला तरी हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात पावसाच्या हलक्या सरी

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, तमिळनाडू किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. समुद्रावरून आलेले बाष्प दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात येऊन ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. गुरुवारपासून पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *