महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ नोव्हेंबर ।। बारामतीमध्ये प्रचार शिगेला पोचलाय. अजित पवार गाव आणि गाव पिंजून काढतायेत. आणि लोकांना सांगतायेत शरद पवार यांच्यानंतर तुमचा वाली मीच आहे. पुतण्याच्या या वक्तव्यावर काकांनी काय उत्तर दिलंय ? ते पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून…
राज्यात सर्वाधिक चुरशीची लढत बारामतीत होतेय. लोकसभेनंतर विधानसभेलाही बारामतीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. बारामतीमध्ये कोण ‘दादा’ ? कोणता पवार पॉवर फुल ? याची चर्चा जोरात सुरू आहे. अजित पवारांनी बारामतीतील एका सभेत बोलताना शरद पवार हे लवकरच राजकारणातून निवृत्त होणार असून त्यानंतर बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही. त्यामुळे भावनिक होऊ मतदान करू नका, असं आवाहन केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर शरद पवारांचा राजकीय वारस कोण? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावर काकांनी आपल्या पुतण्याला जोरदार टोला लगावलाय.
लोकांनी वाली म्हटलं पाहिजे, स्वत: म्हणून काय उपयोग असा टोला पवारांनी लगावलाय. काही दिवसांपूर्वी फलटणमधील प्रचार सभेतही अजित पवारांनी शरद पवार राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर हा पठ्ठ्याच तुमची कामं करणार, तिथं आपलं नाणं खणखणीत आहे, असं वक्तव्य केलं होतं. लोकसभेला गंमत केली आता विधानसभेला गंमत करु नका अशी विनंतीच त्यांनी बारामतीकरांना केली आहे.
1991 साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले. त्याच वर्षी राजीनामा देऊन ते विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर 1995 ते 2019 असे सलग सात वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. आता आठव्यांदा विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. अजितदादांसाठी ही राजकीय प्रतिष्ठेची लढाई आहे. पवार कुटुंबाच्या या राजकीय संघर्षात बारामतीची जनता कोणाच्या पारड्यात मत टाकणार हे पाहणं महत्वाचं आहे.