महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ नोव्हेंबर ।। ट्रायने (Telecom Regulatory Authority of India) बनावट कॉल आणि मेसेज रोखण्यासाठी ऑक्टोबर 2024 पासून नवे नियम लागू केले असले, तरीही स्कॅमर नवीन मार्गांनी लोकांना फसवत आहेत. इंटरनेटवरून होणाऱ्या VoIP कॉलद्वारे (व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) लोकांना फसवले जात आहे. हे कॉल इंटरनेटवरून केले जात असल्याने त्यांचा मागोवा घेणे अवघड होते.
ट्रायच्या नवीन धोरणाची अंमलबजावणी
ऑक्टोबर 1, 2024 पासून ट्रायने नवा नियम लागू केला आहे, ज्यामुळे बनावट कॉल आणि मेसेज नेटवर्क स्तरावरच अडवले जातील. टेलिकॉम कंपन्या आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून अशा फसव्या कॉल्सना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही स्कॅमर सतत नवनवे तंत्र वापरून लोकांना फसवत आहेत. आता ते इंटरनेट कॉलचा वापर करून फसवणूक करत आहेत.
इंटरनेट कॉल्सद्वारे स्कॅम्सची वाढती समस्या
थायलंडच्या टेलिकॉम अधिकाऱ्यांच्या मते, +697 किंवा +698 पासून सुरू होणारे आंतरराष्ट्रीय नंबर हे इंटरनेट कॉल असतात. या नंबरमधून येणारे कॉल्स शोधणे कठीण असते, म्हणून स्कॅमर त्यांचा वापर करून फसवणूक करतात. हे कॉल्स VPN (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) चा वापर करून केल्यामुळे कॉल करणाऱ्याचे ठिकाण शोधणे कठीण होते.
जर तुम्हाला +697 किंवा +698 ने सुरू होणाऱ्या नंबरवरून कॉल आला तर तो उचलू नका. हे कॉल्स बहुतांश स्कॅम किंवा आक्रमक मार्केटिंगसाठी वापरले जातात. तुम्ही अशा नंबरला ब्लॉक करू शकता. चुकून असा कॉल उचलल्यास, कुठलीही वैयक्तिक माहिती देऊ नका. स्कॅमर स्वतःला सरकारी संस्था, बँक किंवा इतर कोणत्याही अधिकृत संस्थांचे प्रतिनिधी असल्याचे सांगतात. माहिती विचारल्यास त्यांना पुनः कॉल करण्याचा सांगावा द्या आणि त्यांचा संपर्क क्रमांक मागा. जर ते नंबर देण्यास नकार देत असतील, तर हे स्कॅम असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
स्कॅम्स कसे रिपोर्ट कराल?
केंद्र सरकारने ‘संचार साथी’ वेबसाईटवर ‘चक्षु’ पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर तुम्ही बनावट कॉल्स किंवा मेसेज रिपोर्ट करू शकता. संशयास्पद कॉल्स किंवा मेसेज आल्यास या पोर्टलवर जाऊन सोप्या सूचनांचे पालन करून रिपोर्ट करा.
दरम्यान, भारत जानेवारीपासून लॅपटॉप, टॅब्लेट आणि पर्सनल कॉम्प्युटर्सच्या आयातीवर मर्यादा आणण्याची तयारी करत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ऍपल सारख्या कंपन्यांना भारतात उत्पादन क्षमता वाढवावी लागेल. या निर्णयामुळे सध्या 8 ते 10 अब्ज डॉलरच्या बाजारमूल्य असलेल्या हार्डवेअर उद्योगावर मोठा परिणाम होईल.