महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ नोव्हेंबर ।। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचाराच्या निमित्ताने राज्यभर फिरत आहेत. उमेदवारांसाठी मोठ्या संख्येनं राज ठाकरे यंदा प्रचारसभाही घेत आहेत. काही दिवसांपूर्वी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी महाराष्ट्रात मनसेच्या पाठिंब्यावरच महायुतीचं सरकार स्थापन होईल, असं विधानही केलं होतं. त्यामुळे राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देणार हे स्पष्ट झालं होतं. पण आता राज ठाकरेंनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
राज्यात नेमकं काय घडणार आहे?
काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीमध्ये निवडणूक निकालांनंतरची त्यांची पक्ष म्हणून काय राजकीय भूमिका असेल यावर भाष्य केलं होतं. “निवडणुकांनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि मनसेच्या पाठिंब्यावर महायुतीचं सरकार येईल”, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यावरून बरीच राजकीय चर्चा पाहायला मिळाली. राज ठाकरेंनी जाहीरपणे महायुतीला पाठिंबा दिल्याचंही बोललं जाऊ लागलं. पण नुकतीच राज ठाकरेंनी मुंबई तकला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत राज ठाकरेंनी महाराष्ट्रात निकालांनंतर मोठे आश्चर्याचे धक्के बसतील, अशा आशयाचं विधान केलं आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
महाराष्ट्रातील निकालांनंतरची स्थिती याबाबत राज ठाकरेंना प्रश्न केला असता त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. “या निवडणुकीत काय होईल हे कुणीच सांगू शकत नाहीये. मला वाटतं यावेळी अनेक गोष्टींचे वेगवेगळे सरप्राईजेस मिळतील. अजून ८-१० दिवस थांबा. मग तुम्हाला कळेल काय सरप्राईजेस आहेत. सरप्राईजबद्दल आधीच कसं सांगणार?” असं राज ठाकरेंनी म्हटल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे.
‘त्या’ विधानावर दिलं स्पष्टीकरण!
दरम्यान, राज ठाकरेंच्या ज्या विधानावरून ही सगळी चर्चा सुरू झाली, त्यावरदेखील त्यांनी यावेळी स्पष्टीकरण दिलं. “मी बोलता बोलता म्हणालो की भाजपाचं सरकार येईल म्हणजे युतीचं सरकार येईल. त्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील ही माझी इच्छा नव्हे तर माझं भाकित आहे. ती युती आहे. त्यात कुणाला मुख्यमंत्री करायचं हे ते ठरवतील. पण आमच्या पाठिंब्याशिवाय त्यांचं सरकार स्थापन होणार नाही हे निश्चित आहे. तुम्ही बघालच”, असं राज ठाकरे म्हणाले.
भाजपाच का?
दरम्यान, भाजपालाच का पाठिंबा दिला या प्रश्नावर राज ठाकरेंनी कारण सांगितलं. “शिवसेनेत असल्यापासून माझा भाजपाशीच दुसरा राजकीय पक्ष म्हणून संबंध आला. काँग्रेस-राष्ट्रवादीशी माझा तसा संबंध आला नाही. ज्यांच्याशी तुम्ही संवाद साधू शकता, त्यांच्यासोबतच तुम्ही राहू शकता”, असं ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांचं पुन्हा केलं कौतुक
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या एका प्रचारसभेत राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं होतं. त्यांनी त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केल्याचं पाहायला मिळालं. “विषयांची समज, त्यांची सोडवणूक करणं, महाराष्ट्राच्या प्रश्नांबाबतचं आकलन या क्षणी देवेंद्र फडणवीसांकडे चांगलं आहे. एकनाथ शिंदे माणूस दिलदार आहे. सढळ हातांनी ते मदत करतात. राजकारणात अशी माणसं लागतात. त्यामुळे त्यांचं कॉम्बिनेशन योग्य पद्धतीने चाललंय”, अशी भूमिका राज ठाकरेंनी यावेळी मांडली.