महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ नोव्हेंबर ।। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सौहार्दाचे संबंध ताणले गेले आहेत, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. यावर बोलताना, थोडा कम्युनिकेशन गॅप जरुर झाला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. माहीम विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावत आहेत. या ठिकाणी सेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी माघार घेण्यास नकार दिल्याने राज ठाकरे चिडल्याचं बोललं जातं.
कम्युनिकेशन गॅप पडल्याची कबुली
माहीमच्या जागेवरुन आपले आणि राज ठाकरे यांचे संबंध गडबडले आहेत का, असा प्रश्न विचारला असता, एकनाथ शिंदे म्हणाले, की थोडा कम्युनिकेशन गॅप नक्की झाला आहे. शेवटी तेही पक्षाचे प्रमुख आहेत. मीही एका पक्षाचा प्रमुख आहे, आणि मुख्यमंत्रीही आहे. काही गोष्टींची चर्चा वेळेवर होणं आवश्यक असतं.
राज ठाकरे स्नेही
राज ठाकरेंनाही कार्यकर्ते जपायचे असतात आणि आम्हालाही. आम्हाला आपापले पक्ष चालवायचे आहेत. राज ठाकरे आमचे स्नेही आहेत, मित्र आहेत. या सगळ्या घडामोडीत कुठले वादविवाद होऊ नयेत, अशी आपली इच्छा असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. राज ठाकरे माझ्याकडे कामं घेऊन यायचे, मी त्यांना मदत करायचो. पण निवडणूक असल्यामुळे माणूस भाषणांमध्ये बोलतो, त्यावर मी फार विचार करत नाही, माझा त्यांच्याशी कुठलाही वाद नाही, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.वेळेचं गणित चुकलं, मुख्यमंत्र्यांनी खासदारांसह सहकाऱ्यांना मंचावरच झापलं
राज ठाकरेंचे शिंदेंवर तोफगोळे
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हिसकावण्यावरुन राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. प्रचारसभांमधून राज ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधला होता. राज ठाकरेंशी संबंध चांगला असताना अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसलं? असा प्रश्न विचारला असता, शिंदे म्हणाले की, राज ठाकरे यांनी काय बोलायचं, हा त्यांचा विषय आहे. त्यांनी काय बोलायचं, हे ते ठरवतील. त्यांच्याशी माझी नेहमीच समन्वयाची भूमिका राहिली आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.