महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ नोव्हेंबर ।। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा आता थंडावणार आहेत. गेली पंधरा-वीस दिवस निवडणूक प्रचाराच्या धुरळ्याने महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून निघाला. कुठे हायटेक प्रचार, तर कुठे घरटी जनसंपर्क. यामुळे राजकारणात कमालीचा धुरळा उडालेला पाहावयास मिळतोय. महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी ही विधानसभा निवडणूक अस्तित्वाची व प्रतिष्ठेची आहे. महाविकास आघाडीकडून उबाठा शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी व काँग्रेस, तर महायुतीकडून भाजपा, शिंदे गटाची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी अशी निवडणूक रिंगणात आहे. बच्चू कडूंचा प्रहार, प्रकाश आंबेडकरांची वंचित बहूजन आघाडी, छत्रपती संभाजी महाराजांची स्वराज्य संघटना, एमआयएमसारखे पक्षही आपला जनाधार व राजकीय उपद्रवमूल्य मतपेटीतून स्पष्ट करण्यासाठी निवडणूक रिंगणात सहभागी झाले आहेत.