महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ नोव्हेंबर ।। ‘‘तुमच्या वडिलधाऱ्यांनी मला कामाची संधी दिली. मधल्या पिढीने अजितला काम करण्याचा अधिकार दिला. त्यांनी काम केलं, याबाबत तक्रार नाही. माझी पिढी-अजितची पिढी आणि आता युगेंद्रची पिढी! युगेंद्रची काम करण्याची पद्धत बारामती तालुक्यासाठी उपयुक्त ठरेल,’ असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडले.
तसेच, ‘तुम्ही देशात कुठंही गेला आणि बारामतीचं नाव काढलं तर देशातले लोक कुणाचं नाव घेतात? असा सवाल करता, ‘शरद पवार… शरद पवार…’ अशा घोषणा लोकांनी दिल्या. यावर ‘हीच परंपरा पुढं चालू ठेवण्यासाठी युगेंद्रला विजयी करा. आम्ही लोकांनी बारामतीचा चेहरा बदलला. त्यापेक्षा अधिक वेगानं काम करतील,’ असे ते म्हणाले.
बारामती येथे महाविकासआघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ झालेल्या सांगता सभेत पवार बोलत होते. याप्रसंगी खासदार धैर्यशील पाटील, सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे, उत्तम जानकर, अॅड. विजयराव मोरे, लक्ष्मण माने,विठ्ठल मणियार आदी उपस्थित होते.
ठळक मुद्दे
बारामती येथे शरद पवार यांच्या सांगता सभेस विराट जनसमुदाय उपस्थित होता.
शरद पवार यांच्या आगमानने उपस्थितांनी ‘रामकृष्ण हरी वाजवा तुतारी’ असा जल्लोष केला.
‘म्हातार फिरतय तिकडं चांगभलं होतंय’ या प्रसिद्ध फलकासह तरुण उपस्थित होते.
सभेस प्रतिभा पवार, सुमती पवार, रेवती सुळे, शर्मिला पवार, श्रीनिवास पवार आदी उपस्थित होते.
‘विधानसभेत युगेंद्रसारखा उच्चशिक्षित, स्वच्छ प्रतिमेचा तरूण पाठवा. पण, यावर काही लोक म्हणतात, ‘मी काय करू?’ अशी मिश्किली शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबाबत केली.
सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह कोरलेली साडी परिधान केली होती.
शरद पवार व्यासपीठाच्या समोरून आले. यावेळी संपूर्ण मंडपाने उठून उभे राहात त्यांना अभिवादन केले.
