Baramati Election Voting : बारामतीचा कौल कोणाला ? घडयाळ की तुतारीची जोरदार चर्चा सुरु….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ नोव्हेंबर ।। विधानसभा निवडणूकीच्या मतदानानंतर आता उत्सुकता आहे ती निकालाची. बारामतीत अजित पवार विरुध्द युगेंद्र पवार अशी प्रमुख लढत होत असून बारामतीकर कोणाच्या पारडयात आपले मत टाकतात, याचे औत्सुक्य आहे.

लोकसभा निवडणूकीत जेव्हा अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मैदानात उतरविले, त्याच वेळेस विधानसभेला ज्येष्ठ नेते शरद पवार हेही अजित पवार यांना सहजासहजी विधानसभेची निवडणूक जिंकू देणार नाही अशी चर्चा होती. त्या नुसारच शरद पवार यांनी थेट अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवारांनाच रिंगणात उतरविले व त्यांच्या पाठीशी ताकद उभी केली.

अजित पवार यांचे गेल्या 35 वर्षातील बारामतीचे काम व त्यांनी आणलेला निधी, केलेला विकास विचारात घेता अजित पवार यांना बारामतीत पराभूत करणे अवघड असल्याचा अंदाज सगळयांनाच होता, मात्र त्यांना बारामतीत अडकवून ठेवण्याची राजकीय खेळी शरद पवार यांनी केली. प्रचाराच्या पहिल्याच सभेत भावनाविवश झालेले अजित पवार व त्या नंतर त्यांची शरद पवारांनी केलेली नक्कल हे मुद्दे राज्यात गाजले.

अजित पवार यांनी यंदा जाणीवपूर्वक शरद पवारांवर टोकाची टीका केली नाही, लोकसभेला एकाकी असलेल्या अजित पवारांच्या मदतीला यंदा त्यांच्या भगिनी विजया पाटील, नीता पाटील व रजनी इंदुलकर मदतीला धावून आल्या व त्यांनी प्रत्यक्षात प्रचारात सहभाग घेतला. युगेंद्र पवार यांच्या प्रचाराची धुरा शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह श्रीनिवास पवार व शर्मिला पवार यांनी सांभाळली.

सांगता सभेला शरद पवार काय संदेश देणार या कडे बारामतीकरांचे लक्ष होते, पण शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर टोकाची टीका व एखादा संदेश देणे टाळले, त्याच वेळेस अजित पवार यांची निवडणूक सोपी झाल्याची बारामतीत चर्चा होती.

सत्तेत सहभाग महत्वाचा….
अजित पवार बारामतीतून फक्त निवडून जाणे बारामतीकरांसाठी महत्वाचे नसून त्यांनी सत्तेत सहभागी होणे गरजेचे असल्याने निकालादरम्यान नेमके काय घडते याकडे सर्वांचे लक्ष असेल. अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्या अजित पवार यांच्यामुळे बारामतीला मोठा निधी मिळाला आहे, त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होणे गरजेचे असल्याचे लोकांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *