Maharashtra Weather : राज्यातील तापमानात होणार घट; तुरळक पावसाचा अंदाज!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ नोव्हेंबर ।। बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) शनिवारपर्यंत कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होणार असून, याच्या प्रभावामुळे राज्यात पुढील आठवडय़ात तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे. दरम्यान, राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, पुढील काही दिवस तो कायम राहण्याचा अंदाज आहे. 

दक्षिण अंदमानच्या समुद्रात (Andaman Sea) सध्या हवेची द्रोणीय स्थिती असून, २३ नोव्हेंबरपर्यंत त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होणार आहे. त्यानंतर पुढे या क्षेत्राची तीव्रता वाढणार आहे. हे क्षेत्र पश्चिम-उत्तर पश्चिमेकडे प्रवास करणार असून, यामुळे तामिळनाडू, केरळ, पाँडेचरी, आंध्र प्रदेशच्या भागात जोरदार पाऊस होणार आहे. याच्या प्रभावामुळे राज्यात बाष्पयुक्त हवा वाहणार असून, खासकरुन दक्षिण महाराष्ट्राच्या भागात ढगाळ वातावरण, तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे थंडीचा कडाका कमी होणार असून, किमान तापमान वाढणार असल्याचे हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे.

कोल्हापूर-दक्षिण कोकणात पाऊस
गेल्या आठवडय़ात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण महाराष्ट्रात पाऊस झाला होता. आताही तशीच स्थिती निर्माण झाली असून, २६ नोव्हेंबरनंतर कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्गच्या भागात पावसाचा अंदाज आहे.

हुडहुडी कायम
राज्यात थंडीने हुडहुडी भरविली असून, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडय़ात याचा कडाका जास्त आहे. पुढील पाच दिवस थंडी कायम असेल, त्यानंतर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याने कडाका कमी होईल. (Maharashtra Weather)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *