Maharashtra Assembly Election 2024 : या ‘हाय व्होल्टेज’ लढतींकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ नोव्हेंबर ।। महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी (ता.२०) मतदान झाले तर शनिवारी (ता.२३) मतमोजणी होणार असून; सत्तेच्या तिजोरीच्या चाव्या नेमक्या कोणाकडे जाणार, हे स्पष्ट होईल. सध्या महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांकडून सत्तेचा दावा केला जात असतानाच अपक्षांना देखील महत्त्व राहणार आहे. मात्र सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती लक्षवेधी लढतींची. राज्याच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या आणि राजकीय भवितव्य ठरविणाऱ्या या लढती ठरणार आहेत.

लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत राज्याचेच नाही तर देशाचे लक्ष लागलेली लढत म्हणजे बारामती मतदारसंघातील. येथे काका-पुतण्यात लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व महायुतीचे उमेदवार अजित पवार यांना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आव्हान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून ते रिंगणात उतरले आहेत. युगेंद्र पवार यांच्या मागे आजोबा शरद पवार यांची ताकद आहे. राज्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेची ही निवडणूक ठरली आहे. यात काका भारी ठरणार की पुतण्या याचा निर्णय बारामतीकर घेणार आहेत. युगेंद्र पवार हे उमेदवार म्हणून उभे असले तरी ही लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच राहिल्याचे चित्र आहे.

आदित्य ठाकरेंना टक्कर
वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आमदार पुत्र आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचा सामना शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांच्याशी झाला. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संदीप देशपांडे यांना उमेदवारी देत ही निवडणूक तिरंगी केली.

‘राज’ पुत्राचे भवितव्य ठरणार
माहीम मतदारसंघातून मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यांना शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांचे आव्हान होते. भाजपकडून अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्यात आला. शिंदे यांनी देखील अमित ठाकरे यांना सहकार्य करावे, यासाठी भाजपने प्रयत्न केले. मात्र त्यात यश आले नाही. यातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महेश सावंत यांना उमेदवारी दिली. ही निवडणूक तिरंगी केली आहे.

मुंबईतील महत्त्वाच्या लढती
कोपरी पाचपाखडी ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे (उद्धव ठाकरे यांची शिवसेना). वांद्रे पूर्व ःवरुण सरदेसाई (उद्धव ठाकरे यांची शिवसेना) विरुद्ध झिशान सिद्दिकी (राष्ट्रवादी काँग्रेस).मानखुर्द शिवाजीनगर ः अबू आझमी (समाजवादी पक्ष) विरुद्ध नवाब मलिक.

आंबेगावात शरद पवार यांना मिळणार साथ?
शरद पवारांनी प्रतिष्ठेची केलेल्या आंबेगाव मतदारसंघाची निवडणूक देखील अत्यंत लक्षवेधी आहे. एकेकाळचे पवारांचे निष्ठावान समजले जाणारे दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मैदानात आहेत. वळसे त्यांचे निकटवर्ती असलेल्या देवदत्त कदम यांना शरद पवार यांनी उमेदवारी दिली. राज्यभर अत्यंत संयमाने प्रचार करणाऱ्या शरद पवार यांनी आंबेगाव येथील सभेत मात्र आक्रमक रूप धारण केले होते. कोणत्याही परिस्थितीत गद्दारांना साथ न देण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच वळसे पाटील यांना ‘पाडा – पाडा – पाडा’ असा नाराच दिला.

आजी व माजी गृहमंत्र्यांची प्रतिष्ठा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र आणि काटोल मतदारसंघाचे उमेदवार सलील देशमुख यांच्या विरोधात भाजपने चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली. असे असले तरी ही लढाई आजी व माजी गृहमंत्री यांच्यात होती. अनिल देशमुख आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गेले वर्षभर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळेच ही निवडणूक फडणवीस यांनी प्रतिष्ठेची बनवली आहे.

भुजबळ काका-पुतणे
येवला मतदारसंघात छगन भुजबळ विरोधात माणिकराव शिंदे लढत झाली. खुद्द शरद पवार यांनी येवला येथे प्रचार सभा घेऊन, भुजबळ यांना पाडण्याचे आवाहन केले होते. नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्याविरोधात छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी अपक्ष म्हणून दंड थोपटले. कांदे यांनी मतदानादिवशी थेट खुनाची धमकी दिल्याने हा मतदारसंघ अत्यंत संवेदनशील बनला होता.

सुनील केदार यांची ताकद
विदर्भातील काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार या सावनेर येथून पहिल्यांदाच मैदानात आहेत. त्यांना भाजपच्या आशिष देशमुख यांनी आव्हान दिले. जिल्हा बँक गैरव्यवहारप्रकरणी सुनील केदार यांना निवडणुकीपासून दूर राहावे लागले. अहेरी मतदारसंघात ‘बाप -लेकी’ ची लढाई आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवार आहेत.

चुरस या मतदारसंघांतही

इंदापूर : आमदार दत्तात्रेय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)

कर्जत- जामखेड : आमदार रोहित पवार (शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) विरुद्ध राम शिंदे (भाजप)

परळी : कृषी मंत्री धनंजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध राजेसाहेब देशमुख (शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)

बार्शी : राजेंद्र राऊत (शिवसेना) विरुद्ध दिलीप सोपल (उद्धव ठाकरे यांची शिवसेना)

सांगोला : आमदार शहाजी बापू पाटील (शिवसेना) विरुद्ध दीपक साळुंखे

(उद्धव ठाकरे यांची शिवसेना)

कोरेगाव : शशिकां त शिंदे

(शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)

विरुद्ध महेश शिंदे (शिवसेना)

कुडाळ : आमदार वैभव नाईक (उद्धव ठाकरे यांची शिवसेना) विरुद्ध नीलेश राणे (शिवसेना)

कागल : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध समरजित घाटगे (शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)

कोल्हापूर दक्षिण : ऋतुराज पाटील (काँग्रेस) विरुद्ध अमल महाडीक (भाजप)

तासगाव कवठेमहांकाळ : रोहित पाटील (शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) विरुद्ध संजय पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

माढा : अभिजित पाटील (शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) विरुद्ध रणजितसिंह शिंदे (अपक्ष) विरुद्ध मीनल साठे (राष्ट्रवादी काँग्रेस)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *