महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ नोव्हेंबर ।। शुक्रवारपासून (२२ नोव्हेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा पहिला सामना सुरू असून दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ५१.२ षटकात १०४ धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारताला या सामन्यात पहिल्या डावात ४६ धावांची आघाडी मिळाली आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसाची सुरुवात २८ षटके आणि ७ बाद ६७ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. त्यांच्याकडून ऍलेक्स कॅरे आणि मिचेल स्टार्क ही पहिल्या दिवशी नाबाद असलेली जोडीने दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली.
२८ वे षटक या दोघांनी खेळून काढले. पण २९ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कॅरेला बुमराहने २१ धावांवर बाद केले. यासह बुमराहने ५ विकेटही पूर्ण केल्या. त्यानंतर मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन यांनी डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, नॅथन लायनला हर्षित राणाने ३४ व्या षटकात ५ धावांवर बाद केले.
यानंतर जोश हेजलवूडने मिचेल स्टार्कला साथ दिली. या दोघांनी शेवटी भारतीय गोलंदाजांना सतावले. त्यांनी ११० चेंडू खेळताना २५ धावांनी भागीदारी केली. पण अखेर ५२ व्या षटकात स्टार्कला हर्षित राणाने बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. स्टार्कने ११२ चेंडूत २६ धावांची खेळी केली.
दरम्यान, या सामन्यात पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाकडून नॅथन मॅकस्विनी आणि ट्रेविस हेड यांनी दोन आकडी धावसंख्या पार केली होती. मॅकस्विनीने १० धावा, तर हेडने ११ धावा केल्या होत्या. पण बाकी खेळाडूंना १० धावाही करता आल्या नव्हत्या. स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ तर शुन्यावर बाद झाला. तसेच उस्मान ख्वाजाने ८ धावा केल्या, तर मार्नस लॅबुशेन ५२ चेंडूत २ धावा करूनच बाद झाला.
या डावात भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराजने २ विकेट्स, तर हर्षित राणाने ३ विकेट्स घेतल्या.
तत्पुर्वी प्रथम फलंदाजी केलेल्या भारतीय संघाचा पहिला डाव १५० धावांवर संपुष्टात आला होता. पहिल्या डावात भारताकडून नितीश कुमार रेड्डीने सर्वाधिक ४१ धावा केल्या. तसेच ऋषभ पंतने ३७ धावा केल्या, तर केएल राहुलने २६ धावा केल्या. ध्रुव जुरेलने ११ धावा केल्या. या चौघांव्यतिरिक्त कोणालाही दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही.
ऑस्ट्रेलियाकडून जोश हेडलवूडने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या होत्या.
