महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ नोव्हेंबर ।। ‘‘हा निकाल अनाकलनीय आहे. यामागचे गुपित शोधावे लागेल. हा ईव्हीएमचा विजय असेल आणि महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य नसेल, तर आम्ही शेवटपर्यंत प्राणपणाने लढत राहू असे आमचे जनतेला आश्वासन आहे,’’ असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
कुटुंबप्रमुख म्हणून माझे ऐकणारा महाराष्ट्र माझ्यासोबत असे वागेल यावर माझा अजिबात विश्वास नाही, नक्की काहीतरी गडबड आहे, अशी शंकाही ठाकरे यांनी उपस्थित केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सायंकाळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जिंकलेल्या आमदारांचे अभिनंदन केले आणि महाविकास आघाडीला ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार मानले. निकालाबाबत आश्चर्य व्यक्त ठाकरे म्हणाले, ‘‘ही लाट नव्हे तर सुनामीच आली असल्याचे वातावरण दिसत आहे. पण हा निकाल सर्व सामान्य जनतेला तरी
पटला आहे की नाही, अशी शंका आहे. या निकालामुळे सत्ताधाऱ्यांना अधिवेशनात मंजुरीसाठी कोणतेही विधेयक मांडण्याची गरजच नाही, असे आकडे आहेत. विरोधी पक्षच शिल्लक ठेवायचे नाहीत, असे त्यांनी ठरवले आहे. देशाची ‘वन नेशन वन पार्टी’ या दिशेने वाटचाल सुरू आहे.’’ महायुतीला आणि भाजपला एवढे यश मिळाल्यानंतर आता तरी ‘अस्सल भाजपचा मुख्यमंत्री होईल का,’ असा सवाल ठाकरेंनी भाजपला विचारला आहे.
महाविकास आघाडीच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत होता, तर महायुतीच्या सभांना गर्दी नव्हती, असे सांगत ठाकरेंनी ‘महायुतीने असे काय काम केले म्हणून त्यांना एवढे यश मिळाले ?’ असा सवाल उपस्थित केला.
सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून, महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जात आहेत म्हणून, महिलांना सुरक्षितता नाही म्हणून की आणखी कोणत्या रागापोटी ही लाट उसळली आहे हे कळत नसल्याचा ठाकरी टोलाही त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, ‘‘लाडकी बहीण योजनेचा हा परिणाम असला तरी लाडक्या बहिणी आमच्या सभांना पण येत होत्या.
महागाईमुळे घर कसे चालवायचे असे प्रश्न त्यांच्यासमोर होते. मग वाढती महागाईला शाबासकी म्हणून मत दिलंय का’’? जनतेला आवाहन करताना ठाकरे म्हणाले, ‘‘आपण निराश होऊ नका, खचून जाऊ नका. हा ईव्हीएमचा विजय आहे किंवा असू शकतो. महाराष्ट्राच्या जनतेला निकाल मान्य नसेल तर आम्ही प्राणपणाने लढत राहू.’’