![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ डिसेंबर ।। : जेजुरी गडावर खंडोबाच्या चंपाषष्ठी षडरात्र उत्सवाला उद्यापासून (ता. २)प्रारंभ होणार आहे. करवीर पीठाचे शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते उद्या सोमवारी सकाळी घटस्थापना होणार असून त्यानंतर चंपाषष्ठी उत्सवाला प्रारंभ होणार आहे. शनिवारी (ता. ७) चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होणार आहे.
मार्गशीर्ष महिना कुलदैवत खंडोबाच्या कुलधर्म कुलाचारासाठी महत्त्वाचा मानला जातो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला खंडोबाचे घट बसतात. चंपाषष्ठीला घट उठतात. देवदिवाळी म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. यानिमित्त गडावर सहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. जय मल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठानच्यावतीने सहा दिवस दुपारी गडावर भाविकांसाठी महाप्रसाद असतो. सोमवारी सकाळी पाखळणी झाल्यानंतर घटस्थापना आणि महापूजा होईल. त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
दुपारी चार वाजता मार्तंड विजय ग्रंथाचे पारायण होणार आहे. बुधवारी सकाळी नऊ ते बारा यावेळेत मल्हारसहस्त्रनाम याग होणार आहे. गुरुवारी देव दिवाळी उत्सव होणार असून दिवाळीच्या फराळांनी पूजा केली जाणार आहे. शुक्रवारी रात्री खंडोबाला तेलवण हळदीचा कार्यक्रम होणार आहे.
यासाठी गावात तेलहंडा मिरवणूक काढण्यात येणार आहे. दररोज सनई चौघडा वाजविण्यात येणार आहे. शनिवारी घट उठविण्यात येतील. यावेळी महापूजा आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले केले आहे. वांग्याचे भरीत आणि भाजी भाकरीच्या महाप्रसादाने चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होणार आहे. ग्रामस्थ पुजारी सेवक वर्ग, जय मल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र मंडळ, मार्तंड देवसंस्थान यांच्यावतीने चंपाषष्ठी उत्सवाचे आयोजन केले जाते. काही दिवसांपासून उत्सवाची तयारी जोरात सुरु आहे. गडावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. षडरात्र उत्सवाला फुलांची सजावट दररोज केली जाणार असल्याची माहिती गणेश आगलावे यांनी दिली.
