Swearing In Ceremony: आज तिघांचाच शपथविधी; इतर मंत्र्यांना ‘या’ तारखेला शपथ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ डिसेंबर ।। महाराष्ट्र भाजपचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस हे आज दि. ५ डिसेंबर रोजी मुंबईतल्या आझाद मैदानात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. मात्र मंत्रिपदांवरुन घोडं अडल्याने गुरुवारी केवळ तीनच नेते शपथ घेणार असल्याची माहिती येत आहे.

माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आज केवळ तिघांचाच शपथविधी होईल. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत. तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार शपथ घेणार आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील की इतर दुसरा नेता शपथ घेणार, हे निश्चित झालेलं नाही.

शपथविधी आटोपल्यानंतर लगेचच कॅबिनेटची बैठक होणार असल्याची माहिती आहे. कारण हिवाळी अधिवेशनाच्या संभाव्य तारखा जाहीर झालेल्या आहेत. त्यापूर्वी काही मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. ७ किंवा ८ तारखेला विधानभवनामध्ये शपथविधी सोहळा होणार आहे. नागपूर अधिवेशनापूर्वी कॅबिनेट विस्तार होईल.

एकनाथ शिंदेंना आता महसूल खातं हवंय?
एकनाथ शिंदे याचं घोडं महसुल खात्यावर अडकल्याचं सांगितलं जात आहे. सुरुवातीला त्यांना गृहमंत्रीपद हवं होतं. त्यांच्या नेत्यांनीच तसं जाहीरपणे भाष्य केलं होतं. ⁠महसुल खाते शिवसेनेला दिल्यास एकनाथ शिंदे आजच उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

तर ⁠शिवसेनेला महसूल खाते न मिळाल्यास शिवसेनेचा दुसरा नेता उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे. यात दादा भुसे यांचं नाव आघाडीवर आहे. ⁠शिवसेनेला नगरविकास आणि गृह खातं देण्यास भाजपचा स्पष्ट नकार असल्याची माहिती आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…
महाराष्ट्राला पून्हा नंबर एकवर न्यायचं आहे

आमच्या वचननाम्यातील सर्व आश्वासनं आम्ही पूर्ण करणार आहोत

शपथ कोण कोण घेणार हे राज्यपालांकडे कळवलेलं आहे

मात्र मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेत आहेत

सर्वांना सरकारने नियमानुसार निमंत्रण दिलं आहे

उद्धवजी, पवारजी सर्वांना विनंती आहे महाराष्ट्राच्या विकसासाठी यावं

मी देखील विनंती करतो काँग्रेसचे नाना पटोले राज ठाकरे यांनीही शपथविधीसाठी यावं

राजभवनातील सूत्रं सांगतात…
राजभवनात उर्वरित मंत्र्यांचा शपथ विधी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आज तीन जणांच्या शपथविधी नंतर उर्वरित मंत्र्यांचे शपथविधी कार्यक्रम मुंबईत होणार असल्याची माहिती आहे. पुढील २ दिवसात खाते वाटप आणि मंत्र्यांची संख्या यावर महायुतीकडून एकमत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *