खातेवाटपाचा निर्णय आता दिल्लीतच? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीला जाणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ डिसेंबर ।। राज्यातील महायुती सरकारच्या शपथविधीला पाच दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाचा तिढा सुटलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बोलणी सुरु आहेत. मात्र, मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाचा (Mahayuti Cabinet Expansion) तिढा कायम राहिला आहे. त्यामुळे आता महायुती सरकारच्या खातेवाटपाचा अंतिम फैसला हा दिल्लीतच होण्याची शक्यता आहे. त्यासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते म्हणजेच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही बुधवारी दिल्लीला जाणार आहेत.

प्राथमिक माहितीनसुरा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज दुपारी दिल्लीला रवाना होतील. हे तिन्ही नेते दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. ही सदिच्छा भेट असली तरी या भेटीदरम्यान राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज दिल्लीतील या गाठीभेटींमध्ये राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष दिल्लीत आज काय घडणार, याकडे लागणार आहे.

महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी होणे आवश्यक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 14 डिसेंबरला महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आजची बैठक निर्णायक मानली जात आहे. या बैठकीत गृहमंत्रीपद कोणाकडे जाणार, याबाबत अंतिम फैसला होऊ शकतो. त्यामुळे या बैठकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपसमोर कोणत्या मागण्या ठेवतात, हे पाहावे लागेल. 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार करायचा झाल्यास येत्या एक-दोन दिवसांत खातेवाटपही निश्चित करावे लागेल. त्यादृष्टीने दिल्लीतील आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शिवसेनेला 13 मंत्रिपदं, पण अब्दुल सत्तारांच्या नावाला भाजपचा प्रचंड विरोध?
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात ठाण्यात मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरी गेले होते. याठिकाणी बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावून एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचे बोलणे करुन दिले. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेला नगरविकास खाते मिळणार आहे. तसेच उपमुख्यमंत्रीपद आणि 13 मंत्रीपदे मिळू शकतात, अशी शक्यता आहे. मात्र, आमदार अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात सामील करुन घेण्यास भाजप राजी नाही. शिवसेनेतील काही आमदारांनीही अब्दुल सत्तार यांच्या नावाला विरोध केल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *