आरटीई प्रवेश नोंदणीला सुरुवात; या दिवसापर्यंत करता येणार नोंदणी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ एप्रिल ।। शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकद़ृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत प्रवेश दिले जातात. त्यासाठी नोंदणी सुरू झाली असून राज्यात पहिल्याच दिवशी 1 हजार 513 विद्यार्थ्यांचे अर्ज पालकांनी भरले असल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज येत्या 30 एप्रिलपर्यंत त्यांच्या पालकांना भरता येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे. शालेय शिक्षण विभागाने यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत बदल केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा नसल्यासच एक किलोमीटरच्या अंतरावरील स्वयंअर्थसहाय्यित शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.


शाळा निवडताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि त्यानंतर स्वयंअर्थसहाय्यित शाळा या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाणार आहे. एखाद्या पालकाला प्राधान्यक्रम म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेची किंवा शासकीय शाळेची निवड करायची असल्यास पालकाच्या प्राधान्यक्रमानुसार संबंधित शाळा निवडता येणार आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलामुळे यंदा मोठ्या प्रमाणात जागा वाढल्या आहेत. राज्यभरातील 76 हजार 30 शाळांमध्ये 8 लाख 86 हजार 109 जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. पुण्यात 5 हजार 187 शाळांमध्ये 72 हजार 968 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी पहिल्याच दिवशी 443 विद्यार्थ्यांचे अर्ज भरले गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *