महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ डिसेंबर ।। बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील अॅक्शन पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. पर्थ आणि ॲडलेडनंतर आता ब्रिस्बेनच्या मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना रंगला आहे. आजपासून पाच कसोटींच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी आणि हवामान पाहता वेगवान गोलंदाजांना मदत मिळणे अपेक्षित आहे. 4 वर्षांपूर्वी गाबा मैदानावर ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर टीम इंडिया पुन्हा त्याच यशाची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने मैदानात उतरली आहे. मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे आणि टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी येथे विजय आवश्यक आहे.
पावसामुळे पुन्हा खेळ थांबला
पावसाने पुन्हा एकदा खेळात व्यत्यय आणला आहे. प्रथमच 5.3 षटकांनंतर पावसामुळे 20-25 मिनिटांचा खेळ वाया गेला. आता 13.2 षटकांनंतर पुन्हा एकदा खेळ थांबवावा लागला. गाबा येथे मुसळधार पाऊस पडत आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता 28 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, पण ख्वाजा आणि मॅकस्वीनी यांनी कोणतीही चूक केली नाही आणि भेट म्हणून विकेटही दिलेली नाहीत.